Skip to content
अंबाजोगाई शहर पोलिसांची मोठी कारवाई
48 गुन्ह्यांतील तब्बल 2 लाख 26 हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल नष्ट

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे येथे आज जप्त करण्यात आलेला अवैध दारूचा मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार नियमानुसार नष्ट करण्यात आला. पोलिस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
पोलीस ठाण्यात विविध कालावधीत दाखल झालेल्या दारूबंदी व संबंधित 48 गुन्ह्यांमधील अंदाजे 2 लाख 26 हजार 275 रुपये किमतीचा मुद्देमाल आज नष्ट करण्यात आला. सदर कारवाई माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली असून दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासनाच्या एसओपीनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच संबंधित साहित्याचा समावेश होता. मद्य बाटल्यांमधील दारू सुरक्षित पद्धतीने बाहेर काढून जमिनीत टाकून नष्ट करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पंचांसमक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली.
विशेष म्हणजे, सन 2025 मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध दारूविरोधात तब्बल 120 कारवाया करण्यात आल्या होत्या. चालू वर्षातही अवैध दारूची वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नवनीत सर, अपर पोलीस अधीक्षक चेतना मॅडम तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईवेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी फड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार मॅडम, पोलीस हवालदार अमोल गायकवाड, बाबासाहेब पोटभरे, महिला पोलीस हवालदार शितल धायगुडे, पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड, अमोल वावळे तसेच स्टेट एक्साइज विभागाचे निरीक्षक चौरे साहेब व त्यांची टीम उपस्थित होती.
अवैध दारू विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून अवैध धंद्यांना आळा बसण्यास सहाय्य मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Post Views: 1,234
error: Content is protected !!