अंबाजोगाई घरफोडी तील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर पोलिसांना यश 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त
अंबाजोगाई घरफोडी तील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर पोलिसांना यश
27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त
अंबाजोगाई :(प्रतिनिधी)
शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत बीड स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई पोलिसांना तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने व 858 ग्रॅम चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 20 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहरातील नंदलालनगर येथील गुलाबचंद सारडा हे कुटुंबीयांसह गौरी पूजनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी शनिवारी पहाटे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीतील सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. संशयित वाहने व व्यक्तींची चौकशीही करण्यात आली.
याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संशयित आरोपी दुचाकीवरून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तपासादरम्यान दि. 25 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून परळी परिसरात सापळा रचून अमर काकासाहेब थोरात (वय 23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांची माहिती दिल्यानंतर जगजीतसिंग अचलसिंग दुखानी (वय 32, रा. शिवाजी चौक, परळी) यालाही ताब्यात घेण्यात आले. तिसरा आरोपी मंगलसिंग हिरासिंग बावरी हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील 27 तोळे (270 ग्रॅम) सोने व 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बीड ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पीएसआय सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारुती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अमलदार सचिन आंधळे, अश्विन कुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे, परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक नरहरी नागरगोजे, पोलीस ठाणे आंबेजोगाई शहर येथील आमदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, पोलीस नाईक तेजस वावळे, सुशांत गायकवाड,यांच्या सह बीड स्थानिक गुन्हे शाखा व आंबेजोगाई पोलिसांनी केली असून या कार्यवाहीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत



