विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंबाजोगाईत कोचिंग क्लास चालकांची बैठक; नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या पोलीसांच्या सूचना
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंबाजोगाईत कोचिंग क्लास चालकांची बैठक; नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या पोलीसांच्या सूचना

अंबाजोगाई | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनतर्फे शहरातील सर्व कोचिंग क्लास चालकांची बैठक घेऊन विविध सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही बैठक मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या सूचनेनुसार तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना मॅडम आणि मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीत कोचिंग क्लास चालकांना सर्व शासकीय परवाने वैध ठेवणे, इमारतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा नियमांचे पालन, फायर एक्स्टिंग्विशर व फायर अलार्म कार्यरत ठेवणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध ठेवणे तसेच वर्गखोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय क्लास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून किमान एक महिन्याचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था राखणे, प्रथमोपचार पेटी आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध ठेवणे, तसेच विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची नियमित नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्याबरोबरच छेडछाड, रॅगिंग, सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील त्रास अथवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून सर्व कोचिंग क्लास चालकांनी शासनाच्या नियमांचे आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले. सुरक्षित, शिस्तबद्ध व विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यातही अशा जनजागृतीपर आणि प्रतिबंधात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


