Thursday, October 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण*

*योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण*


अंबाजोगाई : योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक, अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांची १२ आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षण(इंटर्नशिप) करिता नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून, विद्यार्थी संबंधित उद्योगांमध्ये रुजू झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास व्हावा तसेच रोजगारक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष संपल्यानंतर १२ आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याच नुसार योगेश्वरी पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, संभाजीनगर, अँडविक हाय-टेक प्रा. लि., पुणे, टाटा मोटर्स, पुणे, यश कन्स्ट्रक्शन, अंबाजोगाई तसेच श्री सॉफ्टवेअर सोल्युशन, सातारा या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन नियोजन, देखभाल व दुरुस्ती, औद्योगिक सुरक्षा, व्यवस्थापन कौशल्ये तसेच प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचा अनुभव मिळणार आहे प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा १७ हजार रुपये मानधन देखील मिळणार आहे. अशी माहिती पॉलिटेक्निक विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. शाम गडदे यांनी दिली.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, का. उपाध्यक्ष अॅड. जगदीश चौसाळकर, सचिव श्री. कमलाकरराव चौसाळकर , संचालक श्री.प्रताप पवार व योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

” विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी नामांकित उद्योगांमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाच्या स्वरुपात उपलब्ध होत असल्याने, त्यांचा आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढण्यास मोठी मदत होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला तसेच उद्योग क्षेत्रातील विश्वासार्हतेला अधिक बळ मिळत आहे.”
– श्री.चंद्रशेखर बर्दापूरकर, अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई
अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!