Skip to content
अंबाजोगाईत साकारणार ११०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय!
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; पहिल्या टप्प्यासाठी १०२ कोटींचा निधी मंजूर !

मुंबई / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अंबाजोगाई येथे तब्बल ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, यासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागला आहे.
काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये?
या नवीन रुग्णालयामुळे केवळ अंबाजोगाईच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आरोग्य सुविधांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
अद्ययावत तंत्रज्ञान: रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सोयीसुविधा असतील.
मोठी क्षमता: ११०० खाटांच्या सुविधेमुळे गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी बाहेर धाव घेण्याची गरज पडणार नाही.
स्थानिक दिलासा: स्व. स्वामी रामानंद तीर्थ (SRT) रुग्णालयावरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक जलद सेवा मिळेल.
”अंबाजोगाई आणि परिसरातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, हे आमचे स्वप्न होते. महायुती सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत १०२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याची चिंता मिटण्यास मदत होईल.”
— आमदार नमिता अक्षय मुंदडा.
लवकरच कामाला सुरुवात
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचे काम लवकरच युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल. या यशामुळे नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनिञा अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याच्या नेत्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विशेष आभार मानले आहेत.
Post Views: 153
error: Content is protected !!