हृदयद्रावक! मृत्यूची वेळ कधी चुकलीच नाही तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! मृत्यूची वेळ कधी चुकलीच नाही तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू
चंद्रपूर (प्रतिनिधी)
तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथे काल (बुधवार) दुपारच्या सुमारास घडली आसुनया घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते. मार्कंडासाठी गडचिरोलीमार्गे जात असताना व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा त्यांनी बेत आखला. चंद्रपूर-गडचिरोली सिमेवरील एका झाडाखाली गाडी ठेवून सर्व जण नदी पात्रात उतरले होते.
आंघोळ करीत असतानाच एक लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे दिसताच इतर सर्वांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात काका-काकू आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला. तर 3 बहिणींचा मात्र या पाण्याचा प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात मृत्यू झाला आहे. प्रतिमा प्रकाश मंडल (वय 23), कविता प्रकाश मंडल (वय 21) आणि लिपिका प्रकाश मंडल (वय 18) अशी मृत बहिणींची नावे आहेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सावली पोलिस करत आहेत.
