मातृभाषेतील शिक्षणासोबतच इतर भाषेवर ही आपल्याला प्रभुत्व मिळवता आले पाहिजे श्रीधर नागरगोजे यांचे मत
मातृभाषेतील शिक्षणासोबतच इतर भाषेवर ही आपल्याला प्रभुत्व मिळवता आले पाहिजे –श्रीधर नागरगोजे यांचे मत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मातृभाषेतील शिक्षणासोबतच इतर भाषेवर ही आपल्याला प्रभुत्व मिळवता आले पाहिजे असे मत
“नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण” या परिसंवादात बोलताना श्रीधर नागरगोजे यांनी व्यक्त केले.
११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण ” या विषयावरील परिसंवादात श्रीधर नागरगोजे, सय्यदा सालेहा जबीं यांनी आपली मते व्यक्त केली. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिध्देश्वर बिराजदार होते.
आपल्या विस्तारीत मनोगतात बोलताना श्रीधर नागरगोजे पुढे म्हणाले की, मातृभाषेतील शिक्षणासोबतच इतर भाषेतील शिक्षणावर प्रभुत्व मिळवता आले पाहिजे. इंग्रजी भाषा ही जगावर प्रभुत्व मिळवणारी भाषा आहे म्हणून नव्या शैक्षणिक धोरणात इंग्रजी भाषा शिक्षणाला अधिक महत्त्व आहे. भाषा शिकवणे आणि भाषा शिकणे या वेगळ्या गोष्टी. भाषा शिकवली जात नाही भाषा शिकली जाते. बदलणा-या जगात जर जगायचं असेल तर करन्सी मिळवून देणारी भाषा शिकता आली पाहिजे. म्हणून नव्या शैक्षणिक धोरणात विद्दार्थी १० वर्गात जाईल तेंव्हा त्याला मातृभाषा, व्दितीय भाषा आणि तृतीय भाषा या तिन्ही भाषेवर प्रभुत्व मिळवता आले पाहिजे असे म्हटले आहे.
भाषा शिकणं ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे ग्रंथालये समृध्द झाली पाहिजेत असे नव्या शैक्षणिक धोरणात स्पष्ट म्हटले आहे. मुलांची बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी भाषा शिक्षणावर आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत श्रीधर नागरगोजे यांनी आपल्या विवेचनात सांगितले.
“नव्या शैक्षणिक धोरणात भाषा शिक्षण ” या परिसंवादात उर्दू भाषावर आपले विचार व्यक्त करताना
सय्यदा सालेहा जबीं यांनी नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले आहे. ज्या वयामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास सुरु होतो त्या वयामधील मुलांचे मातृभाषेतील परीपुर्ण शिक्षण पुर्ण झाले पाहिजे असे म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात हे धोरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात सांगितलेले १ ते ५ इयत्तेपर्यंतचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेत शिक्षण द्यावे असे या नव्या शैक्षणिक धोरणात म्हटले आहे.
मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा परी पुर्ण विकास होतो आणि त्यानंतर त्याला इतर भाषेतील शिक्षण घेणे सोपे होते असे म्हटले आहे असे त्यांनी आपल्या विवेचनात सांगितले.
या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी आपल्या विवेचनात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक बौद्धिक क्षमतांचा विकास करण्याची दृष्टी नव्या शैक्षणिक धोरणात दिसते. ही दृष्टी महत्त्वाचीच आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता विकसित होण्याची प्रक्रिया निश्चित वाढणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या विषयात शिक्षण घेण्याची मुभा द्या. मात्र विद्यार्थ्यांवर पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्या मुळे ब-याच वेळेस विद्यार्थी मानसिक दडपणाखाली गेलेले दिसून येतात. असे दडपणाखाली आलेली मुले शिक्षणात जास्त प्रगती घेवू शकत नाही. त्यामुळे
विद्यार्थ्यांना मोकळेपणाने शिक्षण घेवू द्या असे आवाहन डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी केले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पुरी यांनी केले.
