बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा केज तहसील कार्यालयात दणका! उमरीचे तलाठी फलके रंगेहात जाळ्यात; इतर कर्मचारी पसार!
बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा केज तहसील कार्यालयात दणका! उमरीचे तलाठी फलके रंगेहात जाळ्यात; इतर कर्मचारी पसार!

केज
जमीन महसूल आणि सातबारा नोंदीच्या कामासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारताना केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी फलके यांना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीसंबंधीच्या शासकीय कामासाठी तलाठी फलके यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
ठरल्यानुसार उमरी सज्जाचे तलाठी फलके यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
संशयित आरोपी तलाठी फलके यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


