*रस्ता दुरूस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर तातडीने कार्यवाही करा – तालुकाध्यक्ष अमर देशमुख* *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) चा आंदोलनाचा इशारा*
*रस्ता दुरूस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत चौकशी करून संबंधितांवर तातडीने कार्यवाही करा – तालुकाध्यक्ष अमर देशमुख*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) चा आंदोलनाचा इशारा*
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तालुक्यातील रस्ता दुरूस्तीची करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबतची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत उप-अभियंता (जिल्हा परिषद बांधकाम विभाग, अंबाजोगाई, जि. बीड.) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) चे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी निवेदन दिले आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तातडीने कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी उप-अभियंता (जिल्हा परिषद बांधकाम विभाग, अंबाजोगाई, जि. बीड.) यांना मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या विभागामार्फत खालील रस्त्यांवर करण्यात आलेली दुरूस्तीची कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असून संबंधित कामांमध्ये दर्जात्मक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही, अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर रस्ते पुढीलप्रमाणे आहेत – १) रामा-२३२ ते उमराई (रामा-५६) वरून बोरगाव धानोरा प्रजिमा-४५ व इंडिया-१३६ मार्ग., २) १०७ – रामा-३३२ ते श्रीपतरायवाडी मार्ग आणि ३) १२४ श्रीपतरायवाडी ते इजिमा-८९ मार्ग या सदर रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच अनेक ठिकाणी रस्ता उखडणे, खड्डे पडणे, साहित्य निघून जाणे तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास येत आहेत. यावरून संबंधित कामे शासनाने निश्चित केलेल्या तांत्रिक मानके, गुणवत्ता नियंत्रणाच्या अटी व निविदेतील अटींचे पालन न करता करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आपणांस विनंती आहे की, सदर रस्त्यांची तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी (क्वॉलिटी इन्स्पेक्शन) करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरील निवेदनाच्या प्रति माहितीस्तव १) बजरंग बप्पा सोनवणे (खासदार, बीड), २) आ.सौ.नमिताताई मुंदडा (आमदार, केज विधानसभा) आणि ३) जि.प.बां. विभाग-२, बीड. यांना देण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, तानबा लांडगे, दिपक शिंदे, ऋषिकेश सोमवंशी, ऍड.प्रशांत पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना कल्याण भिसे, रामकिसन मस्के, नारायण मुळे, अमोल चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
====================
====================


