शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एक हजार विद्यार्थ्यांना स्कूल कीट वाटप होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एक हजार विद्यार्थ्यांना स्कूल कीट वाटप होणार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अंबाजोगाई : दि. १७ येथील आधार माणुसकी व विद्यार्थी विकास योजनेच्या वतीने बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना रविवारी (दि.१९) स्कुल कीट वाटप करण्यात येणार आहेत. यानिमित्त उपक्रमांतर्गत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.
येथील आर्यवीर मंगल कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रविंद्र कर्वे हे राहाणार आहेत. बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितिन रहमान, पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, विद्यार्थी विकास योजनेचे अध्यक्ष संजीव करंदीकर, गंगा माऊली शुगरचे अध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रुई धारूर येथील दादाराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या
कार्यकारी संचालक आशा बालासाहेब कराड, बीड येथील ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी, वकील संघाचे अध्यक्ष अशोक कवडे, संभाजी राजे स्कूल संचालक परमेश्वर भिसे,
आई हाॅस्पीटलच्या संचालिका डाॅ. सुनिता तोंडगे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत मागील १० वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याच बरोबर विद्यार्थी विकास योजनेच्या सहकार्याने गरजू होतकरू, गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. अशा आर्थिक मदतीमुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या २१ विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले आहे.


