Skip to content
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांची बैठक; विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी १२ महत्त्वपूर्ण सूचना

अंबाजोगाई | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सुमारे ६० शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. बैठकीत वाहतूक नियमांचे पालन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि नियमभंग करणाऱ्यांवर होणाऱ्या कठोर कारवाईबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
ही बैठक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या सूचनेनुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीतील प्रमुख सूचना
चालकांना वाहनामध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी न बसविणे, अतिवेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन न चालविणे, शाळा व गर्दीच्या परिसरात वेग नियंत्रित ठेवणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणीच चढविणे-उतरविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्य अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन न चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय वाहनाचे ब्रेक, टायर, लाईट, इंडिकेटर यांची नियमित तपासणी करणे, फिटनेस, विमा, परवाना व प्रदूषण प्रमाणपत्र वैध ठेवणे, वाहनात प्रथमोपचार पेटी व अग्निशामक यंत्र ठेवणे, विद्यार्थ्यांशी नम्रपणे व जबाबदारीने वागणे तसेच सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणतीही संशयास्पद बाब अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचेही निर्देश देण्यात आले.
पुढील आठवड्यापासून विशेष तपासणी मोहीम
बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, आज देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शालेय व्हॅन व ऑटो रिक्षा चालकांविरुद्ध पुढील आठवड्यापासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, मोटार वाहन कायदा व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब पारवे (ब.क्र. 706), पोलीस हवालदार गोविंद सारुक (ब.क्र. 1184) आणि पोलीस हवालदार त्र्यंबक फड (ब.क्र. 1555) उपस्थित होते. त्यांनी शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन आणि विद्यार्थ्यांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षकांचे आवाहन
बैठकीच्या शेवटी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्रत्येक चालकाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सांगत, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवा द्यावी तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
Post Views: 396
error: Content is protected !!