Skip to content
अंबाजोगाईत बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; तिघे आरोपी अटकेत

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाईतील ट्युशन एरियात अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यावर तिघांनी लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष विनोद माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या माळीनगर, अंबाजोगाई) याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा अभ्यासिका संपवून पायी रूमकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे व एका अल्पवयीन आरोपीने त्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी आशिषला स्थानिकांच्या मदतीने प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे करत आहेत.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करून साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नियमित पोलीस गस्त वाढवून गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Post Views: 448
error: Content is protected !!