Thursday, May 21, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अंबाजोगाईत! महिला शिक्षिकेच्या दोन मुलांची CBI कडून २ तास कसून चौकशी; मोबाईल-सिम जप्त

NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे अंबाजोगाईत!

महिला शिक्षिकेच्या दोन मुलांची CBI कडून २ तास कसून चौकशी; मोबाईल-सिम जप्त

अंबाजोगाई | प्रतिनिधी

देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आता थेट अंबाजोगाईपर्यंत पोहोचल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष पथकाने बुधवारी अंबाजोगाई शहरात गुप्तपणे दाखल होत एका महिला शिक्षिकेच्या दोन मुलांची तब्बल दोन तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठ परिसरातील संबंधित बहिण-भावंडांनी नुकतीच NEET परीक्षा दिली होती. हे दोघेही अंबाजोगाईतील मोटेगावकर क्लासेसमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजते. सीबीआयच्या पथकाने या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेत विविध मुद्द्यांवर सखोल तपास केला.

मोबाईल, सिम कार्ड जप्त

चौकशीदरम्यान तपास यंत्रणेने दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केले असून त्यातील चॅट्स, कॉल रेकॉर्ड, व्यवहार आणि डिजिटल डेटा तपासला जात आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.

लातूर कोचिंग नेटवर्कवर संशय

तपासाची दिशा आता लातूरमधील कोचिंग नेटवर्क आणि संभाव्य रॅकेटकडे वळल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यातील काही नामांकित कोचिंग क्लासेस आणि एजंट्सच्या माध्यमातून मोठे जाळे कार्यरत होते का? याचा शोध सीबीआय घेत असल्याचे बोलले जात आहे.

⚠️ खाजगी क्लासेस चालक आणि डॉक्टर्सही रडारवर?

विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील काही खाजगी कोचिंग क्लासेस चालक तसेच काही खाजगी डॉक्टर्स यांचे संबंध NEET पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या RCC कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर यांच्याशी होते का? याबाबतही सीबीआय माहिती गोळा करत असल्याचे समजते.

यामुळे अंबाजोगाई शहरातील काही शिक्षण व्यावसायिक आणि डॉक्टर्सही सीबीआयच्या रडारवर असल्याची चर्चा रंगली आहे.

मराठवाड्यात खळबळ

यापूर्वी बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही संशयितांची नावे समोर आल्यानंतर आता अंबाजोगाईत झालेल्या या कारवाईमुळे NEET पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे मराठवाड्यात किती खोलवर रुजली आहेत, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आता जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून कोणते नवे धागेदोरे समोर येणार?

कोणती मोठी नावे उघड होणार?

याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!