*शिफारशीवर ओळखपत्र, गळ्यात आयडी आणि बोगस पत्रकारितेचा गोरखधंदा?*
शिफारशीवर ओळखपत्र, गळ्यात आयडी आणि बोगस पत्रकारितेचा गोरखधंदा?
वेबसाईट, यूट्यूब चॅनलच्या नावाखाली वाढला बोगस पत्रकारांचा उच्छाद; प्रशासन कारवाई करणार का?

अंबाजोगाईसह जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारितेचा विषय चांगलाच चर्चेत आला असून पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या काही प्रकारांमुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांसह प्रामाणिक पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे. हातात मोबाईल, गळ्यात आयडी कार्ड, सोशल मीडियावर पेज किंवा यूट्यूब चॅनल सुरू करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेण्याचे प्रमाण वाढल्याने पत्रकारिता क्षेत्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
विश्वासार्ह वृत्तसंस्था, संपादकीय जबाबदारी किंवा पत्रकारितेचा कोणताही अभ्यास आणि अनुभव नसताना काही जण केवळ ओळखीच्या किंवा शिफारशीच्या जोरावर एखाद्या दैनिकाचे ओळखपत्र मिळवतात आणि त्यानंतर “प्रेस”चा धाक दाखवत विविध शासकीय कार्यालयांमध्ये वावर वाढवत असल्याची चर्चा सुरू आहे. काही तथाकथित पत्रकार हे स्वतः इतर व्यवसाय करत असूनही पत्रकारितेच्या नावाखाली वेगळाच प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे ऑटो रिक्षा चालक, ट्रॅव्हल्स चालक-मालक, ॲम्बुलन्स चालक तसेच इतर व्यवसाय करणारे काही जण अचानक पत्रकार बनल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काही जणांनी छोट्या वेबसाइट, यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेजच्या नावाखाली स्वतःला संपादक, मुख्य प्रतिनिधी किंवा पत्रकार म्हणून घोषित केल्याने खऱ्या पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
यामध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे काहींच्या पत्नी सरकारी किंवा खासगी नोकरीत असतानाही पत्रकारितेच्या नावाखाली कार्यालयांमध्ये मुक्त वावर केला जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “नवी वार्ता”, “जुनी वार्ता” करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंडवणे, दबाव निर्माण करणे, स्वतःचा प्रभाव दाखवणे तसेच वैयक्तिक कामे करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.काही जण शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी दमदाटी करणे, तर काही जण सोशल मीडियावर अपूर्ण माहिती टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे प्रामाणिक व निष्पक्ष पत्रकारितेवर विश्वास ठेवणाऱ्या खऱ्या पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून अपूर्ण अर्धवट किंवा एकतर्फी माहिती प्रसारित करून अधिकाऱ्यांवर, राजकीय नेत्यांवर दबाव आणतात, तर काही जण जाहिराती, आर्थिक व्यवहार किंवा इतर स्वार्थ साधण्यासाठी पत्रकारितेचा वापर करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पत्रकारिता हा समाजसेवेचा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याची ओळख धूसर होत चालल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
प्रामाणिक पत्रकार अनेक वर्षे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी संघर्ष करत असताना काही बोगस पत्रकार केवळ आयडी कार्ड आणि सोशल मीडियाच्या जोरावर पत्रकारितेची बदनामी करत असल्याची भावना पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे काही जण गळ्यात आयडी कार्ड घालून शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, रुग्णालये आणि विविध विभागांमध्ये फिरताना दिसतात. “प्रेस” या नावाचा वापर करून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे खरे पत्रकार आणि बोगस पत्रकार यांच्यात फरक ओळखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
पत्रकारिता हे केवळ आयडी कार्ड किंवा सोशल मीडिया पेजचे नाव नसून ती समाजाप्रती असलेली जबाबदारी, सत्यासाठी लढण्याची भूमिका आणि जनतेचा आवाज बनण्याची प्रक्रिया आहे. मात्र काही मंडळी पत्रकारितेचा वापर प्रभाव, दबावतंत्र आणि वैयक्तिक फायद्यासाठी करत असल्यामुळे संपूर्ण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
यामुळे प्रशासनाने पत्रकार ओळखपत्रांची सखोल पडताळणी करून अधिकृत नोंदणी, वृत्तसंस्थेची वैधता आणि तपासावी, तसेच बोगस पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंद्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दै.बीड सुपरफास्ट*च्या वॉल वरून साभार


