*महावितरणने नियमितपणे ग्राहकांना बिले द्यावीत ; अन्यथा अंबाजोगाईकर वीज बिले भरणार नाहीत – डॉ.राजेश इंगोले यांचा इशारा*
*महावितरणने नियमितपणे ग्राहकांना बिले द्यावीत ; अन्यथा अंबाजोगाईकर वीज बिले भरणार नाहीत – डॉ.राजेश इंगोले यांचा इशारा*

=====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महावितरण द्वारे अंबाजोगाई मध्ये विद्युत ग्राहकांकडून सक्तीने विज बिल वसुली सुरू आहे. वीज बिले न भरल्यास विद्युत ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करून त्यांना अंधारात ठेवण्यात येत आहे. वरवर पहाता ही कृती जरी नियमात बसणारी वाटत असली तरी सुद्धा अंबाजोगाई मध्ये ७० टक्के विद्युत ग्राहकांना नियमित बिले मिळत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे महावितरणने नियमितपणे ग्राहकांना बिले द्यावीत ; अन्यथा अंबाजोगाईकर वीज बिले भरणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे नेते डॉ.राजेश इंगोले यांनी दिला आहे.
या संदर्भात जनतेला जाहीर आवाहन करताना व आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे नेते डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले आहे की, महावितरणची ही विद्युत बिले देण्याबाबतची अनियमितता ही बेकायदेशीर व नियमबाह्य आहे. त्यामुळे वाढीव बिलांवरील सक्तीची वसुली ही चुकीची आहे. विद्युत ग्राहकांना वीज बिले प्रत्येकमहिन्याच्या महिन्याला न दिल्यामुळे एकदाच चार ते पाच महिन्यांची बिले देण्यात आली आहेत. कुणाकुणाला तर तब्बल एक-एक वर्षाची बिले देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदरील वीज वापराचे युनिट्स अनेक पटीने वाढवून त्या युनिट वापराच्या हिशोबाने वाढीव दराने वीज बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहेत. असे अनेक प्रकार अंबाजोगाई मध्ये घडले आहेत. या सर्व प्रकरणांची रितसर चौकशी करून वाढीव विद्युत बिले आलेल्या ग्राहकांना ही बिले तात्काळ कमी करून त्यांना योग्य ती बिले द्यावी अन्यथा महावितरण विज मंडळाच्या विरूद्ध विद्युत ग्राहकांचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा अंबाजोगाईचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. नियमितपणे विद्युत बिले देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे व वीज ग्राहकांचा अधिकार देखील आहे. महावितरणच्या बिल दिरंगाईमुळे अनेक विद्युत ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, तसेच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नाहक मनस्ताप होत आहे. त्यामुळे महावितरणच्या मुख्यअभियंत्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी तात्काळ या प्रकरणी तातडीची बैठक बोलावून यावर आवश्यक ती कार्यवाही करणे ग्राहकांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.त्यामुळे त्यांनी विभागाची तातडीची बैठक बोलवावी अशी आग्रही भूमिका डॉ.इंगोले यांनी यावेळी घेतली. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात इंगोले यांनी अंबाजोगाईतील अनेक मान्यवर प्रतिष्ठितांनी, दुकानदारांनी महावितरणच्या या भोंगळ कारभाराविषयी माझ्याकडे दूरध्वनी द्वारे तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी अनेक तक्रारी मी वैयक्तिक पातळीवर वीज कर्मचाऱ्यांशी बोलून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, दिवसेंदिवस या तक्रारी वाढतच आहेत. त्यामुळे याप्रकरणी धोरणात्मक निर्णय महावितरण वीज मंडळाने घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी व्यक्त केले. येणाऱ्या काही दिवसात जर या प्रकरणांचा निपटारा महावितरण द्वारे झाला नाही तर याप्रकरणी ग्राहक मंचात तक्रार करण्यातच येईल. परंतु, विद्युत ग्राहकांचे एक जनआंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा डॉ.राजेश इंगोले यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून केला आहे.
=====================
=====================


