विशेष लेख

‘अस्वस्थ मनाचे पडघम’

एखाद्या घराची खिडकी किंचित उघडी असेल तर त्या डोकावून पाहण्याचा मोह भल्याभल्यांना होतो त्यामुळेच आत्मचरित्राचा वाचक वर्ग खूप मोठा आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहणे जर इतकी स्वभाविक वृती असेल तर माणूस समोर असता त्याच्याशी संवाद करणे हेही तितकेच स्वाभाविक आहे. जिथे आपल्याच माणसाच्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही तिथे दुसऱ्याच्या मनात डोकावून बघणे अधिकच कठीण बाब होऊन बसते. दुसऱ्याच्या मनाचा कप्पा किंचित किलकिला करणे साध्य होतेच असं नाही. मनाची अस्वस्थता मग ती आपली असो व इतर कुणाची,  वैयक्तिक कारणाने असो वा आणखी कुठल्याही, ती संवादान दूर  होऊ शकते आणि सकारात्मक काही घडू शकतं असा सूर विद्या निकम यांच्या ‘अस्वस्थ मनाचे पडघम’  ह्या सार्थ शीर्षक असलेल्या ललित लेखसंग्रहात सर्वत्र गुंजत राहिलेला जाणवतो.

बागेतल्या झाडाजवळ ठराविक वेळी येऊन’ झाडाच्या बुंध्यातून उगवल्यासारखी निश्चल बसून नंतर ठराविक वेळेत निमूटपणे निघून जाणाऱ्या , परग्रहावरची वाटावी अशा एका बाई विषयी लेखीकेला कुतूहल वाटते आणि तिच्याशी संवाद साधावा असे वाटू लागते. पॅपेतच्या परदेशी असलेल्या तरुण मुलाचा मृत्यू, हा धक्का सहन न होऊन अर्धांग वायू झालेला चर्चच्या क्वायर ग्रुपमध्ये व्हायोलिन वाजवणारा पॅपेतचा नवरा अलेक्स , या गोष्टीमुळे जगण्याला सामोरं जायला घाबरणारी पॅपेत लेखिकेला अस्वस्थ करते. आपले पेटी वादन बाळबोध आहे याचे लेखिकेला पुरते भान असूनही एक दिवस ती आपला हार्मोनियम घेऊन सुरांचा पक्का असलेल्या ॲलेक्स समोर जाते. त्याचे लक्ष पुन्हा संगीताकडे वेधू पाहते आणि पॅपेतच्या मदतीने त्याला व्हॉयोलिन वाजवायला प्रवृत्त करते. त्या व्हॅयोलियन वादनातून त्या जोडप्याला सहजीवनचा नवा सुर सापडतो. आपल्या एका अल्पशा कृतीतून हे घडू शकते याचे अपार समाधान लेखिकेला लाभते.

 हातीपायी धडधकट असलेले, जीवनातील लहान-सहान त्रुटी अनेकजण सहन करू शकत नाही . एवढ्या तेवढ्यासाठी देवाला आणि दैवाला वेठीस धरणाऱ्यानी सुधाकर- रेणुका या अंधयुगलांच्या भेटीचा प्रसंग वाचला तर तो त्यांच्या नुसता काळजाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही तर जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी देखील सकारात्मक करील.

 माणुसकीने माणसे जवळ येतात .रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळीक अधिक घट्ट ठरू शकते हे अश्लेषाच्या कथेवरून ( हो. ‘कथाच म्हणायला हवी ) दिसते. लेखिका आणि अश्लेषा या दोघींच्या वयातले अंतर माणुसकीच्या नात्याने मिटते. हे अनामिक नाते पारदर्शी आहे. तिथे हक्क आहे पण हेवा नाही. हट्ट आहे पण अट्टाहास नाही. ह्या नात्याचा स्त्रोत निर्मळ प्रवाहासारखा पुढे वाहत राहतो याचे प्रत्यंतर ‘ऋणानुबंध ‘ह्या ललितांमध्ये येते.

मुंबईसारख्या महानगरात भरगच्च लोकल प्रवासात विविध वस्तू विकणाऱ्या एखाद्या ‘हिरकणीशी ‘लेखिकेचे मैत्र जुळते. नियती गरागरा फिरवते आणि परिस्थिती सगळं शिकवते .वादळ वाऱ्यात सावरायला शिकवते. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीनुरूप स्वतःला बदलत ठेवणं आणि सभोवतांलच्या परिस्थितीला प्रतिसाद देत राहणं म्हणजे जगणं हे लेखिकेला ट्रेन मधील फेरीवाली शिकवून जाते. अशा कष्टकरी वर्गाकडे , त्यातही ती बाई माणूस असेल तर माणूस म्हणून तिचा विचार करण्याची साक्षरता लेखिकेमध्ये ओतप्रोत भरलेली आहे हे जाणवते.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करून कोल्हापूरची अनुराधा एम एस डब्ल्यू होते. लग्नानंतरच्या सर्व जबाबदाऱ्या निभावून सासरचा जाच सहन करत सामाजिक बांधिलकी म्हणून बालमजुरांना , तळागाळातल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन  देते. हॉटेल ,गॅरेज ,दुकानांमध्ये काम करणाऱ्या बालमजुरांची सुटका करते. त्याकरता ती ‘अवनी ‘नावाची संस्था काढते. ‘मला रडणे आवडत नाही लढणे आवडते ‘असं अनुराधा ठणकावून सांगते आणि विधवा ,घटस्फोटीत परितक्ता महिलांसाठी ‘एकटी ‘नावाची संस्था सुरू करते .अमेरिकेतील पीस फाउंडेशन तिच्या मदतीला धावून येते. विवेक आणि प्रभावी विचार ह्या तिच्या जवळच्या भांडवलच्या जोरावर  हिंसा, आरोग्य, रोजगार आणि कायदेविषयक सजगता असे चार परिवर्तनवादी प्रवाह एकत्र करून आपली चळवळ नियोजित पद्धतीने चालू ठेवते. अनुराधाचा हा प्रवास बराचसा, शतकापूर्वी पंडिता रमाबाईंनी ‘एकला चलो रे’ पद्धतीने केलेल्या भारतीय स्त्री विषयक कार्याचे आणि तत्संबंधी  त्यांना असलेल्या तळमळीचे स्मरण करून देणारा आहे.

  शॉपिंग मॉलमध्ये माणसांची गर्दी पाहून भारतात माणसांच्या ऐवजी ग्राहक जन्माला येतो की काय ? असा प्रश्न देखील लेखिकेला पडतो. या पार्श्वभूमीवर तिला मर्ढेकरांचा गणपत वाणी आठवतो. अर्धा पाव इतक्या कमी वजनाचा साबुदाणा कुरकुर न करता देणारा, पुन्हा हातावर गुळाचा खडा ठेवून आजोबांची विचारपूस करणारा गावातला वाणी तिला आठवतो. हातात पैसा नसला तरी प्लास्टिक मनी मुळे गरजेपेक्षा जास्त वस्तूंची अकारण खरेदी करण्याची मानसिकता बोकाळली आहे. लहान मुलांकडे बड्या कंपन्या ग्राहक म्हणून पाहतायत हे पालकांनी लक्षात घेऊन सावध राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन करून माणसाच्या मनातील ,समाजमनातील सु प्तावस्थेतील क्रौर्य अधिकच प्रकर्षाने अधोरेखित होते असं तिला वाटते.

   विचारवंतांच्या हत्या होत आहेत . विचारवंतांना आपल्यातल्या विचारांची प्रतीकात्मक हत्या करावी लागत आहे. आपण कोणत्या युगात आहोत असा प्रश्न तिला पडतो. तिचे मन अस्वस्थ होते मनात वाचत असलेले अस्वस्थतेचे पडघम तिला चैन पडू देत नाहीत.

चिंतनशीलतेतून व व्यापक समाजहिताच्या कळकळीतून जाणवलेले प्रश्न लेखिका एकीकडे नोंदवत राहते तर दुसरीकडे हात गाडीवरचा आंबट चिंबट खाऊचा फ्लेक्स पाहून तिच्या मनातल्या शाळकरी वयातल्या आठवणी अनावर होतात. तिला सगळे शाळा सोबती आठवतात .तेव्हाच्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवतात. मग त्या कवितांबरहुकूम ती एक संहिता लिहिते. पुढे रवींद्र नाट्य मंदिरात ‘आठवणीतल्या कवितांचा ‘प्रयोग होतो .या अनुभवात वाचक समरस होऊन जातात.

ॲक्वार्थने कुष्ठरोगावर औषध शोधून काढले म्हणून माझ्यासारखे हजारो कुष्ठरोगी बरे झाले. तो आमचा देव आहे असे म्हणून आपल्या उपकर्त्याच्या पुतळ्यापुढे रोज दिवा लावणाऱ्या नऊवारीतल्या वृद्ध कुष्ठरोगी ग्रामीण स्त्रीची कृतज्ञता ‘संस्कृतीची लस ‘ या लेखातून मनाला स्पर्शून जाते .एखाद्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू होणे म्हणजे ती आपल्या वासनापूर्तीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता गृहीत धरणारे काही पुरुष असतात. मात्र जवळच्या नातलगाबाबतीत असा धक्कादायक अनुभव लेखीकेला आई-वडिलांचा सुरक्षित पांगुळगाडा नाकारल्यावर ऐन बत्तीशीत आला.

       संपूर्ण लेखक संग्रहात ती कुठेच उद्देश वगैरे करत नाही. आयुष्याला आपण कसे सामोरे गेले हे सांगता सांगता आपली सकारात्मक दृष्टी कशी विकसित गेली हे सांगण्याचा कल दुगोचर होतो. परिस्थितीनुरूप आपण कणखर बनत गेलो आपल्या जिभेला धार येत गेली आणि कायम हातात तलवार असलेली ‘झाशीची राणी’ अशी आपली प्रतिमा झाल्याची ती प्रांजळपणे कथन करते.

    अमृता प्रीतमचा चौथा कमरा सारख्या स्वतःचा शोध म्हणून ती आपल्या नव्या घरात मोठ्या अक्षरात लिहिते ‘माय लाईफ  डायरेक्टर बाय मी स्वतः ‘. मरण सुंदर असणे आणि मरण सन्माननीय असणे  हया विषयीचा ‘ युथनेशिया ‘या लेखाचे तसेच जर्जरावस्थेतील व्यक्तीला अध्यात्मिक व्याख्यान देण्यापेक्षा तिचे मरण सुलभ कसे करता येईल याविषयीच्या तिबेट मधल्या ‘एक्झिट हाऊस ‘ च्या  विचारांचे स्वागत करणारे लेख लेखिकेचे नुसती वैचारिक प्रगल्भता दर्शवत नाही तर आधुनिक आणि चांगल्या विचारांचे अभिसरण व्हायला पाहिजे या दृष्टीने स्वेच्छामरण व दयामरण ह्याचा सारासार विचार होऊन कायदेशीर पावले उचलली गेली पाहिजे अशी तिची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसते.

 आपल्या प्रिय मृत्त नातेवाईकांचे गुणविशेष आपल्या अंगी भिनवून त्याचा उपयोग इतरांसाठी करता आला तर ते करण्याची, पारंपारिक रितीरीवाजांना काळानुसार आणि आपल्या शक्यतानुसार नवा आयाम देण्याची आवश्यकता ‘आईची नवमी ‘मध्ये लेखिका लक्षात आणून देते . मैत्रिणींना ,यशस्वी विद्यार्थ्यांना किंवा एखाद्याच्या वाढदिवसाला  वस्तू म्हणून आपण पुस्तक देतो. सवाष्णा स्त्रीची ओटी भरताना खणा नारळा ऐवजी पुस्तकांनी भरतो. आपण चैनीच्या वस्तूची खरेदी थांबवली असून पुस्तके मात्र खरेदी करतो. कारण पुस्तकांनी आपल्याला आत्मविश्वासाने जगण्यासंबंधीच्या सकारात्मक दृष्टिकोन दिला. आधुनिक विचार दिले. प्रतिकूल परिस्थितीत हवी असणारी शाश्वत सोबत दिली. असे लेखिका आवर्जून नमूद करते.

   एका विशिष्ट वयानंतर काही माणसे देव देव करू लागतात ही वाचनवेडी लेखिका मात्र आपण पुस्तकातूनच विश्वव्यापी परमात्म्याचा आणि दुसरीकडे माणसातील माणूसपण जपण्याचा ध्यास बाळगून आहोत असं सांगते. अच्युत गोडबोले ह्या आपल्या आवडत्या लेखकावरच्या लेखात ती म्हणते, ‘वारा जसा ढगांना नकळत दिशा देतो तसं त्यांच्या पुस्तकांच्या पानापानाने आत्मविश्वास आणि धैर्य दिलं ‘ ..

     ‘कधी मिळेल दर्जा राजा मुकुटाचा ‘,’महागाई ‘असे काही तुरळक लेख वैचारिक स्वरूपाच्या आहेत. लेखांची एकूण मांडणी, ‘माळ्यावरून काढलेली समई ब्रासोने चमकवल्यावर आता ती न पेटता माझ्या लिखाणाच्या टेबलावरच्या बाजूला उभी असते नऊवारीतल्या शालीन – घरदाज सुलोचनेसारखी ‘अशी साध्या – सोप्या सरळ अकृत्रिम शैलीत आहे. लेखिकेचा वाचन व्यासंग दांडगा असला तरी तिला प्रतिभा, अलंकृत भाषेचा सोस नाही .तिची वृत्ती चिंतनशील आहे .मनोवृत्ती संवेदनशील आहे.

    डॉक्टर शंकर शेष या प्रसिद्ध नाटककाराचे ‘खजुराहो का शिल्पकार’ ह्या नाटकातले वाक्य , ‘जेव्हा विवेक नष्ट होतो तेव्हा पतनाचा रस्ता अधिकच सुंदर दिसायला लागतो ‘ हे तिच्या मनात घर करते. कधी तिला कबीराचा दोहा आठवतो तर कधी चार्वाकच्या पायाशी जाऊन ती बसते. तर कधी  गुलजारांच्या ओळी तिच्या ओठावर येतात पण उगाचच अनाठायी पेरणी मात्र ती करत नाही .

      या ललित लेखांमधील  लेखिकेला भेटलेली स्त्री पात्रे लक्षवेधी आहेत .बाईचा उपजत शहाणपण आणि तिचं आत्मभानदेखील अधोरेखित करते. जीवनातला साधेपणा, जिवंतपणा, सहजता टिकवण्याकरीता  संहाराला सर्जनता हेच उत्तर आहे अशी चिकिस्तक स्वतंत्रदृष्टी लेखिकेला गवसली आहे. वाचताना ,बघतांना आणि जगताना आलेले अनुभव लेखिकेच्या मनपटलावर पडघम वाजवू लागतात आणि त्याचे पडसाद वाचकांच्या मनावर  उमटविण्यात लेखिका यशस्वी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही .

डॉक्टर अनुपमा उजगरे

अस्वस्थ मनाचे पडघम

लेखिका :विद्या निकम

अष्टगंध प्रकाशन

पृष्ठे :१२६  किंमत :२५०रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!