आर एस एसची नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उमेदवारा कडून घडवण्यात आलेले लक्ष्मी दर्शन या मुळे महायुतीची गाडी सुसाट
आर एस एसची नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उमेदवारा कडून घडवण्यात आलेले लक्ष्मी दर्शन या मुळे महायुतीची गाडी सुसाट
मनोज जरांगे यांची ओबीसी कोठ्या मधून केलेली आरक्षणाची मागणी व निवडणुकीत स्पष्ठ न केलेली भूमिका या मुळे महाविकास आघाडीला बसला फटका

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपसाठी आर एस एस ने लावलेली नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा, राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, निवडणूक काळात महायुतीच्या उमेदवारा कडून घडवण्यात आलेले लक्ष्मी दर्शन, मनोज जरांगे यांनी ओबीसी कोठ्या मधून केलेली आरक्षणाची मागणी व निवडणुक काळात स्पष्ठपणे न घेतलेली भूमिका आदी मुद्या मुळे राज्यात महायुतीची गाडी सुसाट वेगाने सुटल्याचे स्पष्ठ पणे दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकार मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अडीच वर्षा पूर्वी महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल सरकार खऱ्या अर्थाने बदनाम सरकार म्हणून ओळखल्या जाऊ लागलं मात्र या बदनाम सरकारच्या पाठीशी जी डोकी कार्यरत झाली आणि आहेत ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची व या डोक्याला तोड नाही असंच म्हणावं लागेल. यात पुन्हा लोकसभा निवडणुकी मध्ये महायुतीला आलेलं अपयश पाहून तर ही डोकी आणखी कार्यक्षम झाली आणि सर्व राज्यभर सर्वच मतदार संघात छुपा अजिंडा राबवत भाजपला पोषक वातावरण तयार करत होती.

याच डोक्यातून आलेल्या कल्पने मधून शासनाने योजना कार्यान्वित केली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ज्यांच्या हातात घराची चावी असते तिलाच लाडकी बहीण बनवून तिला खुश करण्यासाठी दरमहा दीड हजार रु देण्याची केवळ घोषणा केली नाही तर त्या योजनेची अमलबजावणी करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर पाच महिन्याचे साडेसात हजार रु पाठवले आणि बहिणींना खुश करून टाकलं आणि याच लाडक्या बहिणींनी महायुतीची केवळ इज्जत वाचवली नाही तर पुन्हा महिन्याला दोन हजार मिळतील या स्वप्नाने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली आणि या मुळेच महायुतीला मिळालेल्या 236 जागा पैकी एकटा भाजप 132 जागा जिंकून सर्वाधिक जागा मिळवलेला आणि सत्तेच्या जवळ गेलेला सर्वात मोठा पक्ष ठरला असून यात शिवसेना शिंदे गटाला 57 जागा रा कॉ अजित दादा गटाला 41 जागेवर विजय मिळवता आला असून महाविकास आघाडीला मिळालेल्या 46 जागा पैकी अखिल भारतीय काँग्रेसला 16 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 20 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचन्द्र पवार गटाला 10 जागा मिळालेल्या असून 12 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकी मध्ये भाजप महायुतीला जे घवघवीत यश मिळालं या मागे जेवढे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद जेवढे कामी आले तेवढेच या विजयी उमेदवारांनी आपआपल्या मतदार संघात मतदारांना जे लक्ष्मी दर्शन घडवलं त्या दर्शनाने ही विजयश्री खेचून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली यात भाजप ला कधीही न मते पडणाऱ्या काही समाज बांधवांनीही लक्ष्मी दर्शनाचा लाभ मोठ्या प्रमानावर घेतल्याने त्यांची मते भाजप च्या पारड्यात पडली आहेत हे नाकारून चालणार नाही.
या निवडणुकी मध्ये महायुतीला मिळालेल्या यशा मध्ये महत्वाची भूमिका ती ओबीसी फॅक्टरची राहिली असे म्हणावे लागेल व याला कारण ठरलं ते मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे यांच आंदोलन. मागील 1 वर्षा पासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणा साठी जो आंदोलनात्मक पवित्रा घेतला या मुळे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वांखाली संपूर्ण मराठा समाज एकवटला गेला याचा फायदा लोकसभा निवडणुकी मध्ये झाल्याचे दिसून आले मात्र विधानसभेला चित्र पालटल्या गेलं.
या निवडणुकी मध्ये निवडणुका लढवायच्या न लढवायच्या, उमेदवारांना पाठिंबा द्यायचा न दयायचा या मुद्यावर उमेदवारी परत घेण्याच्या तारखे पर्यंत कुठलीही स्पष्ठ भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्वच मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला व तो त्याच्या सोयीने उमेदवारांच्या पाठीशी विभागला गेला आणि याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला.

या उलट मनोज जरांगे यांनी आरक्षणाची जी मागणी रेटून धरली होती ती केवळ आणि केवळ ओबीसी कोठ्या मधून आरक्षण मिळावी ही.
आरक्षण ओबीसी कोठ्यातून दिल गेलं तर सर्वात मोठी कुऱ्हाड आपल्यावर कोसळेल या भीती पोटी जरांगे यांच्या या मागणी मुळे शांततेत राहणाऱ्या कुठल्याही भानगडीत न पडणाऱ्या मायक्रो ओबीसी समाजाने या निवडणुकी मध्ये आपली ताकत महायुतीच्या बाजूने लावल्याचे दिसून येत आहे.
या शिवाय महायुती सरकारने निवडणुकी पूर्वी छोट्या छोट्या समाजा साठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची घोषणा करून सर्व समाजाला एक आशेचा किरण दाखवला अस म्हणलं तर वावगं ठरणार नाही या सह आणखी काही मुद्या मुळे राज्यात महायुतीची गाडी सुसाट वेगाने सुटल्याचे स्पष्ठ पणे दिसत असून यावर ही महाविकास आघाडी कडून जी ईव्हीएम वर शंका उपस्थित केल्या जात आहे त्यात कितपत तथ्य आहे या बद्दल आज तरी न लिहलेल बर.
Post Views: 249