*अंबाजोगाईत महिला क्रिकेटची मुहूर्तमेढ माही परमार यांनी रोवली – डॉ.राजेश इंगोले* जागतिक महिला दिनानिमित्त क्रिकेट प्रशिक्षक माही परमार यांचा सन्मान
*अंबाजोगाईत महिला क्रिकेटची मुहूर्तमेढ माही परमार यांनी रोवली – डॉ.राजेश इंगोले*
जागतिक महिला दिनानिमित्त क्रिकेट प्रशिक्षक माही परमार यांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रिकेट प्रशिक्षिका तसेच क्रीडा पत्रकार माही परमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि समाजात त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी ही संस्था स्थानिक पातळीवर क्रिकेटला चालना देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. ग्रामीण आणि शहरातील युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे तसेच क्रीडा क्षेत्रात नवे खेळाडू घडवणे हा अकॅडमीचा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी सातत्याने विविध क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रात महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने क्रिकेट प्रशिक्षिका तथा क्रीडा पत्रकार माही परमार यांचा अंबाजोगाईतील क्रिकेट मधील अमूल्य योगदाणाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. . या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.राजेश इंगोले म्हणाले की, माही परमार यांना मी खूप जवळून ओळखतो.
माही परमार या क्रिकेट क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असून महिला क्रिकेटच्या विकासासाठी त्या सातत्याने कार्य करत आहेत. त्या एक कुशल क्रिकेट प्रशिक्षिका म्हणून अनेक तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्याचबरोबर त्या क्रीडा पत्रकारितेतही उल्लेखनीय काम करत असून महाराष्ट्र स्पोर्ट्स या न्यूज चॅनेलच्या संपादक म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्पोर्ट्स प्लस या दैनिकामध्ये महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रतिनिधी प्रमुख म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत. महिला क्रिकेटला योग्य व्यासपीठ मिळावे, महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी मिळावी यासाठी माही परमार सातत्याने प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या महिला क्रिकेटच्या विकासासाठी मार्गदर्शन करत आहेत. अनेक नवोदित महिला खेळाडूंना त्यांनी प्रेरणा दिली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्रभर महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. क्रिकेट प्रशिक्षिका, क्रीडा पत्रकार आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्या या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी सातत्याने काम करत महिला क्रिकेटला बळकटी देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेत अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
त्या अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने क्रिकेट क्षेत्रात काम करत आहेत. महिला क्रिकेटच्या उभारणीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्रभर महिला क्रिकेटमध्ये त्यांचे नांव आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. भविष्यात अंबाजोगाईसारख्या शहरालाही त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा निश्चितच मोठा फायदा होईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माही परमार यांना मिळालेला हा सन्मान हा त्यांच्या कार्याचा उचित बहुमान असल्याचे सांगत हा पुरस्कार त्यांना भविष्यातही अशाच प्रकारचे क्रीडा कार्य करण्याची प्रेरणा देईल अशी अपेक्षा डॉ.इंगोले यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही माही परमार यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मान सोहळ्यावेळी राजकिशोर मोदी, निलेश मुथा,पोलीस निरीक्षक शरद जोगदंड , प्रेमलता मूथा, अनितोष कातकडे, अविनाश साठे, साहेबा लोंढे, जयकुमार लोढा, सतीश बालुतकर, डॉ.संदीप जैन, अक्षय परदेशी, अभिजित जोधळे, प्रतीक बोथरा, ऋषभ रांका आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते. अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून भविष्यातही अकॅडेमीने क्रीडा स्पर्धा आणि सन्मान सोहळे आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहित परमार,सूत्रसंचलन अशोक तापडिया तर आभार प्रदर्शन निलेश मुथा यांनी केले.
======================
======================


