ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत हॉटेल मेवाडच्या मालकावर भ्याड हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार

अंबाजोगाईत हॉटेल मेवाडच्या मालकावर भ्याड हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या हॉटेल मेवाडचे मालक अविनाश परशुराम मेहता यांच्यावर ८ मार्च रोजी सायंकाळी झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुल ईदगले, पवार यांच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ ते सव्वा ७ वाजण्याच्या दरम्यान अविनाश मेहता हे आपल्या मोटारसायकलवरून हॉटेलकडे जात होते. त्यावेळी दहातोंडे स्टील दुकानासमोर गाडीला साईड देण्याच्या किरकोळ कारणावरून राहुल ईदगले , पवार व त्यांच्या दोन साथीदारांनी मेहता यांच्यावर काठी व लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीत मेहता गंभीर जखमी झाले.

    घटना इथेच न थांबता आरोपींनी नंतर मेवाड हॉटेलमध्ये जाऊन तेथील खुर्च्या व काऊंटर लोखंडी रॉडने फोडून तोडफोड केली. तसेच मेहता यांना जिवे मारण्याची धमकी देत हॉटेलमध्ये आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी हॉटेलच्या बाहेर धाव घेतली.

    या प्रकरणी अविनाश परशुराम मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११९(२), ३२४(४), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे पुढील तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!