Skip to content
मुंबई येथील देवी भक्ताने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर श्री योगेश्वरी देवीला दिली तब्बल एक कोटीची देणगी

अंबाजोगाई: (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबई येथील भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे.
योगेश्वरी देवीच्या मंदिराचे सध्याचे मुख्य शिखर शंभर वर्षांपूर्वीचे आहे. हे शिखर पूर्णपणे चुन्याच्या बांधकामात असल्याने काळाच्या ओघात ते काहीसे कमकुवत झाले होते. या ऐतिहासिक शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय योगेश्वरी देवस्थान समितीने नुकताच घेतला होता. या कामासाठी साधारन ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने आपला दूत पाठवून एक कोटी रुपयांचा धनादेश समितीच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केला. ही रक्कम बँकेत जमा झाली असून या आठवड्यापासून शिखराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे.
या महत्त्वाकांक्षी जिर्णोद्धार प्रकल्पासाठी तामिळनाडू येथील कुशल कारागिरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कारागीर आपल्या पारंपारिक कौशल्याने शिखरावरील अतिशय सूक्ष्म आणि देखणे नक्षीकाम पूर्ण करणार आहेत. मंदिराच्या वैभवात भर पडणाऱ्या या कामासाठी अचानक मिळालेल्या एवढ्या मोठ्या निनावी देणगीमुळे भाविकांमध्ये मोठे कुतूहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post Views: 169
error: Content is protected !!