तलवारीचा धाक दाखवून युवकाचे अपहरण करून लुटले, दोन जणाविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल

अंबाजोगाई: (प्रतिनिधी)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून 19 वर्षीय तरुणाचे तलवारीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याला शेतात नेऊन मारहाण करत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना
11 फेब्रुवारी रोजी घडल्याचे उघडकीस आली आसुन याप्रकरणी दोन जना विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की प्रवीण माळअप्पा थाटकर (वय 19, रा. धनगर गल्ली, अंबाजोगाई) हा तरुण शिक्षण घेत असून एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रवीण हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या मित्राच्या फुलांच्या दुकानासमोर बोलत उभा होता. यावेळी आर्यन उर्फ भैड्या मांदळे आणि सनी वाहुळे हे दोघे युनिकॉन मोटारसायकलवर तिथे आले. आरोपी आर्यन मांदळे याने प्रवीणच्या गळ्याला तलवार लावून त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याजवळील एका शेतात नेले.
त्या ठिकाणी दोन्ही आरोपींनी प्रवीणला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या खिशात असलेले फायनान्सचे गोळा केलेले 7 हजार 300 रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. प्रवीणने आरडाओरड केल्यानंतर लोक तिथे धावून आले, तेव्हा आरोपींनी ‘पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन तिथून पळ काढला. आरोपींच्या दहशतीमुळे प्रचंड घाबरलेल्या प्रवीणने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी याप्रकरणी आर्यन उर्फ भैड्या मांदळे आणि सनी वाहुळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आसुन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 605