Skip to content
*मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पामध्ये जिल्हास्तरीय सामाजिक समानता मेळाव्याचे आयोजन*
*प्रत्येक कुटुंबात रूजले पाहिजे, स्त्री – पुरूष समानतेचे मुल्य – डॉ.राजेश इंगोले*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला आणि युवती तसेच युवक आणि पुरूष यांचे सामाजिक समानता मेळावे मनस्वीनी महिला प्रकल्पामध्ये आयोजित करण्यात आले होते.
यावेळी युवक व पुरूषांच्या मेळाव्यास अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा व्याख्याता डॉ.राजेश इंगोले तर युवती व महिलांच्या मेळाव्यास स्त्री मुक्ती परिषदेच्या कार्यकर्त्या अलका पावनगडकर व मराठी अभिनेत्री समता जाधव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना प्रमुख व्याख्याता डॉ.राजेश इंगोले यांनी अनेक महापुरूषांचे दाखले देत या महापुरूषांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी व अंधश्रद्धेच्या जीवनातून मुक्त करून त्यांना सामाजिक समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे उदाहरणांसह स्पष्ट केले. भगवान तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरू संत तुकाराम, राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना परंपरावादी हाल अपेष्टांतून बाहेर काढून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली. ज्या काळामध्ये स्त्रीला चूल आणि मूल याच दोन गोष्टींत अडकवून स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे असे मानले जात होते. त्या काळात या महापुरूषांनी स्त्री मुक्तीचा लढा उभारला आणि आज भारतामध्ये स्त्रियांना शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक समानता मिळाली. त्यामध्ये या महापुरूषांचा वाटा मोलाचा आहे असे आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत, स्त्री शिकली असली तरी सुद्धा आजी बहुसंख्य वर्गामध्ये बालविवाह सर्रास होताना दिसत आहेत. हुंडा देणे घेणे ही प्रथा सुरू आहे. हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्त्रियांवर होणारे बलात्कार, अन्याय अत्याचार यांचे प्रमाण वाढत आहे. मग खऱ्या अर्थाने हीच सामाजिक समानता म्हणायची का..? असा प्रश्न डॉ.इंगोले यांनी उपस्थित केला. स्त्री-पुरूष समानता जर खऱ्या अर्थाने आणायचे असेल समाजातील रूजलेली पुरूषप्रधान मानसिकता बदलवून तर प्रत्येक कुटुंबाने स्त्री आणि पुरूष समानतेचे मूल्य आपल्या कौटुंबिक संस्कारांमध्ये रूजविले पाहिजे आणि आपल्या स्वतःपासून याची सुरूवात केली तरच सामाजिक समानता स्त्री पुरूष समानता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा डॉ.इंगोले यांनी व्यक्त केली. अलका पावनगडकर व मराठी अभिनेत्री समता जाधव यांनी स्त्री-पुरूष समानता सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्य यावर भर देत मुली महिलांशी मुक्तपणे संवाद साधला. वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी पुरूषप्रधान मानसिकता आणि व्यसनाधीनता यावर मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी मागील चार वर्षांपासून ज्या गावपातळीवरील प्रेरक व प्रेरिकांनी गाव पातळीवरील कौटुंबिक हिंसा तसेच बालविवाह रोखण्यासाठी भरीव कामगिरी केली त्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दशकापासून बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडा प्रथा हे विषय घेऊन मनस्विनी महिला प्रकल्प गाव पातळीवर स्त्री-पुरूष व युवक युवती यांच्यामध्ये जनजागृतीचे काम करीत आहे. आत्तापर्यंत गेल्या तीन वर्षांत होणारे ३५० बालविवाह, पालकांशी संवाद साधून तर कधी १०९८ ची मदत घेऊन रोखले आहेत. निर्धार समानता या प्रकारच्या अनुषंगाने अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील स्त्रिया व पुरूष यांच्याशी सातत्याने संवाद करणे गांव पातळीवरील बाल संरक्षण समिती याच्या क्षमता वाढविणे, लोकांमध्ये जनजागृती करणे व महिलांना सन्मान आणि रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. या दोन्ही मेळाव्यास प्रत्येकी ३०० व ३५० एवढे प्रतिनिधी हजर होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा.अरूंधती पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर मनस्वीनीचे प्रकल्प समन्वयक राहुल निपटे यांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन तसेच इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे हा मेळावा यशस्वी झाला.
==================
=======================
Post Views: 194
error: Content is protected !!