Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा अ‍ॅक्शन मोडवर; पाहिल्याच बैठकीत कर्मचाऱ्यांना दिले कडक निर्देश*

*अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा अ‍ॅक्शन मोडवर; पाहिल्याच बैठकीत कर्मचाऱ्यांना दिले कडक निर्देश*

*एका दिवसात मिळणार जन्म प्रमाणपत्र; स्वच्छता, पाईपलाईनमधील गळती रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य*

अंबाजोगाई: शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी नगरपालिकेतील विविध विभागांच्या कर्मचारी आणि नगरसेवकांची पहिली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत आणि प्रशासकीय कामकाजाचा सखोल आढावा घेत सर्व विभागांना कामकाजात सुधारणा करण्याचे स्पष्ट आदेश दिले. शहराचा कायापालट करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जनसेवक म्हणून काम करावे आणि नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत बोलताना मुंदडा यांनी पाईपलाईनमधील गळती रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सध्या शहरात १० ते १२ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने कमी करून नियमित करण्यावर त्यांनी भर दिला असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पूर्वीच्या कंत्राटदाराने काम सोडल्याने लवकरच नवीन निविदा प्रक्रिया राबवली जाईल, तोपर्यंत नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करून आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून शहर चकाचक ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

विद्युत विभागाच्या आढाव्यादरम्यान त्यांनी संपूर्ण शहरात कुठेही अंधार राहणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले. ज्या भागात पथदिव्यांचा प्रकाश कमी आहे, तिथे तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे भविष्यात शहरातील सर्व पथदिवे सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास जन्म प्रमाणपत्र अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बैठक व्यवस्था आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.

यावेळी नगराध्यक्षांनी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचाराबाबत कडक इशारा दिला. नागरिकांशी सन्मानाने वागणे बंधनकारक असून कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी स्पष्ट शब्दांत दिला. आपल्यापासून काहीही लपून राहत नाही, त्यामुळे पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे आणि काही अडचणी असल्यास थेट संपर्क साधावा, असे सांगत सर्वांनी मिळून अंबाजोगाईच्या विकासासाठी जनसेवक म्हणून कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!