Skip to content
वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या ३२ लाखांच्या निधीचा धनादेश नंदकिशोर मुंदडांनी केला मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले योगदान; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. या द्वारे जमा झालेल्या ३२ लाख ८४ हजार ८४० रुपयांच्या निधीचा धनादेश मुंदडा यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आ. नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.
मुंदडा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू, पुष्पगुच्छ किंवा सत्कार टाळून नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिक, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी इच्छादानपेटीतून एकूण ३२ लाख ८४ हजार ८४० रुपयांची रक्कम जमा झाली. त्यातील ३१ लाख ८४ हजार ८४० रुपयांचा एक व १ लाख रुपयांचा दुसरा असा दोन धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्त करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योगदानाचे स्वागत करत म्हटले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी अशा स्वरूपाने पुढे यावे, हे अत्यंत प्रशंसनीय आहे. याप्रसंगी नंदकिशोर मुंदडा यांच्या समवेत अक्षय मुंदडा उपस्थित होते.
राज्य सरकारने नुकतेच मराठवाड्यासह विविध भागांतील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंदडा यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिलेल्या योगदानाचे कौतुक होत आहे.
Post Views: 77
error: Content is protected !!