Skip to content
आजच्या साहित्यिकांमध्ये समाजाविषयीच्या चिंतनाचा अभाव कमी

साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी व्यक्त केली खंत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
आजच्या साहित्यिकांमध्ये समाजाविषयीच्या चिंतनाचा अभाव कमी होत चालली असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणा-या “भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार” वितरण सोहळ्यात व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त करण्यात आलेल्या मनोगतात डॉ. वासुदेव मुलाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जगताप हे उपस्थित होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. वासुदेव मुलाटे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, भगवानराव लोमटे यांच्या नावाचा पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य आहे.
पुरस्कार काय असतो, पुरस्कार मिळाल्याने नेमकं काय होत? पुरस्कार ही एक पाठीवर मारलेली थाप असते. प्रेम भरल्या हाताने पाठीवर फिरवलेला हात असतो. साहित्य ही जीवन सांगणारी गोष्ट आहे, म्हणून साहित्यिकांना जीवनाचे खरे आकलन व्हायला हवे, त्याला माणसाचे चेहरे वाचयला यायला पाहिजे. ज्याला माणसाचे चेहरे वाचायला येतात त्यालाच जीवन म्हणजे काय हे समजलेल असते.
साहित्य हे वेदनेतुन निर्माण होते.
हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे व साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे. साहित्यकार हा काळाचा, समाजाचा शिल्पकार असतो. देश आज अराजकतेच्या उंबरठ्यावर नेवून ठेवलेला असतांना या परिस्थितीवर किती साहित्यिक लिहितात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अलिकडे नवीन साहित्यिकामधध्ये समाजाविषयी चिंतनाचा अभाव कमी असल्याचे दिसून येते. पुर्वी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर वर्षभर चर्चा होत होती, आता मात्र अशी चर्चा होताना दिसत नाही. कारण त्यांच्या भाषणात समाज चिंतनाचा अभाव असल्याचे दिसून येते.
भगवानराव लोमटे हे महाराष्ट्रातील साहित्य, समाजकारण आणि राजकारणातील मोठं नाव होतं. मात्र जवळच्या माणसाची ओळख आपल्यालाच होत नसत हे खरे आहे. अशा या मोठ्या प्रमाणात माणसाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हा माझा सन्मान आहे असे मी समजतो. आपल्या भोवतीचं वास्तव लिहिणारी नवी साहित्यिकांची पिढी निर्माण झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी म्हटले की, डॉ. वासुदेव मुलाटे यांना भगवानराव लोमटे यांच्या नावाने असलेला स्मृती पुरस्कार देण्यात येतो हा माझा सन्मान आहे. आज काल स्मृती ठेवावी अशी माणसे आजच्या पिढीत शिल्लक नाहीत. चांगली माणसं निर्माण करावयाची असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलेले निकष आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार अंगीकारणे यांची गरज.
आजच्या राजकारणात टपो-या पोरांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कडून फारशा अपेक्षा नाहीत. या टपो-या पोरांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच वातावरण दुषीत होत चालले आहे.
साहित्य म्हणजे आयुष्य जगताना जे आपल्याला स्पष्टपणे बोलता येत नाही, ते शब्द कमावून लिखीत स्वरुपात लिहीणे म्हणजे साहित्य. ज्या साहित्यात सामान्य माणसाची भाषा नसते ते साहित्य लवकरच संपुष्टात येते. संस्कृत भाषेतील साहित्य असेच संपुष्टात आले. ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तुकारामांने मराठी साहित्यास कळस चढवला.
डॉ. वासुदेव मुलाटे हे सामान्य माणसांच्या व्यथा लिहीणारे लेखक आहेत, म्हणून ते मोठे आहेत. डॉ. मुलाटे यांनी विद्यार्थ्यांची एक आणि वाचकांची एक अशा दोन पिढ्या घडवल्या हे महत्त्वाचे आहे. अशा या महान साहित्यिकाला माझ्या हस्ते सत्कार देवून सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानले. यावेळी प्रमुख अतिथी राजेंद्र जगताप यांनी लोमटे बापूंच्या राजकारण, काहीक्षण व साहित्य विश्वातील त्यांचा कार्याचा आढावा घेतला.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी सांगितले की, १९८५ साली यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला भगवानराव लोमटे यांनी सुरुवात केली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर करण्याचे काम या समारोहात भगवानराव बापूंनी सुरु केले. हा जागर त्यांच्या पश्चात सातत्याने सुरू ठेवण्याचे काम यशवंतराव चव्हाण स्मृती समिती सातत्याने करते आहे. भगवानराव लोमटे यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्य,संगीत, नाटक, पत्रकारिता शिक्षण, आणि सुसंस्कृत राजकारणी यापैकी एका व्यक्तीची निवड करुन त्यांना “कै. भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार” देवून सन्मानित करण्याचे काम गेली १३ वर्षे समितीचे वतीने करण्यात येते. यावर्षी चा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि भगवानराव लोमटे यांचे स्नेही डॉ. वासुदेव मुलाटे यांना देताना समितीला आनंद होतो आहे. यापुढे हा कार्यक्रम बापूंच्या स्मृतींच्या निमित्ताने सातत्याने घेण्यात येईल असे ही दगडू लोमटे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा परीचय समितीचे उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे यांनी करुन दिला. समितीचे कोषाध्यक्ष सतीश लोमटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सन्मानपत्राचे वाचन साहित्यिक बालाजी सुतार यांनी केले. शेवटी आभार प्रा. भगवान शिंदे यांनी मानले. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रा. अंबादास फटांगरे यांनी केले.
या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील प्रख्यात कवी प्रभाकर साळेगावकर, नाट्य दिग्दर्शक डॉ. सतीष साळुंखे, अशोक हिंगे, माजी आमदार जनार्दन तुपे, विलासराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब, भगवानराव शिंदे बाप्पा यांच्या सह बीड जिल्ह्यातील व शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 188
error: Content is protected !!