Skip to content
२०११ पूर्वीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमणाचे नियमन; आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टे प्रदान

अंबाजोगाई : “सर्वांसाठी घरे २०२२” या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीअंतर्गत अंबाजोगाई शहरात शासकीय जागेवरील अतिक्रमणांचे नियमन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमातून अनेक कुटुंबांना त्यांच्या निवाऱ्याचा कायदेशीर हक्क मिळत असून, शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून गट क्र. ५९५, माता रमाई चौक येथे राहणाऱ्या २० लाभार्थ्यांना शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार प्रमाणित करण्यात आल्याचे अधिकृत प्रमाणपत्र आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
आ. मुंदडा यांनी या निर्णयासाठी वेळोवेळी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरातील अनेक कुटुंबांना आपल्या घराचा कायदेशीर दर्जा प्राप्त होणार आहे. या योजनेतून एकूण १०४९ लाभार्थ्यांना पट्टे मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व कायदेशीर घराचा हक्क मिळणार आहे.

याप्रसंगी आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, “घर हे प्रत्येक माणसाचा मुलभूत हक्क आहे. शासनाच्या या उपक्रमातून अंबाजोगाईतील नागरिकांना कायदेशीर घराचा हक्क मिळवून देणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. यापुढेही शहरातील प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.”
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, महादू मस्के, जगन बापू सरवदे, पंडितराव जोगदंड, संजय गंभीरे, बनसोडे मामा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 777
error: Content is protected !!