सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी
सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी
नांदेड
एका सराईत गु्न्हेगाराला पोलीस पकडायला गेले असता आरोपीने पोलिसांवरच बंदूक रोखली. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गुन्हेगार जखमी झाला. प्रभाकर हंबर्डे असे या गुन्हेगाराचे नाव असून तो विष्णूपुरी येथील रहिवासी होता. त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. एका मकोका केसमध्ये तो जामिनावर सुटला होता. यादरम्यान त्याने एका व्यक्तीला खंजीर मारुन जखमी केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याप्रकरणात पोलीस गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रभाकर हंबर्डे याचा शोध घेत फिरत होते. त्यावेळी पोलिसांना तो विष्णुपुरी भागात कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस विष्णुपुरी येथे पोहोचले तेव्हा प्रभाकर हंबर्डे तिथून पळून गेल्याची माहिती मिळाली.
प्रभाकर हंबर्डे पांगरी गावाकडे पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन गाठले. पोलीस त्याच्या जवळ पोहोचले तेव्हा प्रभाकरने त्याच्याकडीच पिस्तूल पोलिसांवररोखले. तो पोलिसांवर फायरिंग करणार इतक्यात पोलिसांनीच त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून प्रभाकरवर गोळी झाडली. ही गोळी प्रभाकरच्या पायातून आरपार गेली.
पोलिसांची गोळी लागल्यानंतर प्रभाकर हंबर्डे जखमी झाला. पोलिसांनी त्याला विष्णुपुरी दवाखान्यात आणले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून नांदेड जिल्ह्यात सध्या या थरारक घटनेची चर्चा रंगली आहे
