Tuesday, May 20, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

एसटी बसच्या धडकेत थर्मल कर्मचारी मृत्युमुखी; कुटुंबीयांना ₹1 कोटी 57 लाख रु. नुकसान भरपाई देण्याचे अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाचे आदेश

एसटी बसच्या धडकेत थर्मल कर्मचारी मृत्युमुखी; कुटुंबीयांना ₹1 कोटी 57 लाख रु. नुकसान भरपाई देण्याचे अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाचे आदेश

अंबाजोगाई :
    लातूर–परभणी मार्गावर भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत थर्मल पॉवर स्टेशन, परळी येथे कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय सायस यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात, अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालय तथा मोटार अपघात न्यायाधिकरण यांचे न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर, एसटी महामंडळाला मयताच्या कुटुंबीयांना ₹1 कोटी 57 लाख (रुपये एक कोटी सत्तावन्न लाख) नुकसानभरपाई व त्यावर 8% दराने वार्षिक व्याज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर व्याज मागील तीन वर्षांपासून मोजून अंतिम रक्कम प्रत्यक्ष अदा होईपर्यंत लागू राहील.
३० मे २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मयत सायस सुभाष कावळे रा अंबाजोगाई हे अंबाजोगाईहून स्कूटीने परळीतील थर्मल पॉवर स्टेशनकडे नोकरीसाठी जात असताना, कनेरवाडी येथील रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ, लातूरहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस क्रमांक MH-20-BL-3606 ने त्यांच्या स्कूटीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात सायस गंभीर जखमी झाले व नंतर दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.
    या घटनेप्रकरणी तक्रारदार सचिन कावळे  यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर 144 /2022 भा.दं.वि. कलम 304A, 279, 337, 338, 427 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मयत सायस सुभाष कावळे रा अंबाजोगाई
यांच्या पत्नी, दोन मुले, भाऊ व वृद्ध आई-वडिलांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील ॲड. दत्तकुमार लांब यांच्यामार्फत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. या प्रकरणात अर्जदारांकडून साक्षीदारांची साक्ष व लेखी पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर प्रतिवादी एसटी महामंडळानेही स्वतःच्या बाजूने साक्षी व पुरावे सादर केले. विशेषतः अपघात घडविणाऱ्या एसटी बसचालकाची साक्ष सुद्धा प्रतिवादींच्या वतीने नोंदविण्यात आली.
    सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद, साक्षी व पुरावे तपासल्यानंतर, न्यायाधीश संजश्री घरत जिल्हा न्यायालय तथा मोटार अपघात न्यायाधिकरण यांनी मयताच्या कुटुंबीयांना ₹1,57,00,000 (रुपये एक कोटी सत्तावन्न लाख) नुकसानभरपाई व त्यावर मागील तीन वर्षांपासून ८% दराने व्याज आणि रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत व्याजासह नुकसान भरपाई एसटी महामंडळाने देण्याचे आदेश दिले. परिणामी, एकूण भरपाई रक्कम व्याजासह पावणेदोन कोटी रुपये होणार आहे.
    या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने ॲड. दत्तकुमार लांब यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. सचिन शेप, ॲड. ईश्वर लांब, ॲड. बालाजी सोळंके आणि ॲड. रमेश धस यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!