सोमवारी लग्न गुरुवारी देशसेवेसाठी रवाना; पत्नीसह परिवाराची खंबीर साथ, भावुक क्षणांने सर्व जण गहीवरले
सोमवारी लग्न गुरुवारी देशसेवेसाठी रवाना; पत्नीसह परिवाराची खंबीर साथ, भावुक क्षणांने सर्व जण गहीवरले
जळगाव
लग्न गाठ बांधून 48 तास लोटत नाहीत तोच जळगावच्या मनोज पाटील या जवानावर युद्धजण्य परस्थिती मूळे देशाच्या रक्षणार्थ आपल्या कर्तव्यावर परतन्याची वेळ आली असता आपल्या अंगाची हळद ओली असतानाच मनोज च्या पत्नीने व पूर्ण परिवाराने खंबीर साथ देत मनोजला देश सेवे साठी रवाना केले.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाकिस्तानचं पाणी बंद करुन अनेक व्यवहार तोडले.
त्यानंतर बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळं भारतीय वायू सेनेने उद्ध्वस्त केली. गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम भारताने नष्ट केल्या. पाकिस्तानच्या कुरापतींना अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.
एकूणच भारत-पाकिस्तान देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. जळगावचे मनोज पाटील हेदेखील स्वतःच्या लग्नविधीसाठी गावी आले होते. परंतु त्यांनाही तातडीने माघारी बोलावण्यात आलेलं आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा येथील खेड गावचे मनोज पाटील यांचा ५ मे २०२५ रोजी यामिनी पाटील यांच्याशी विवाह झाला. लग्न होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत, तोच त्यांना सैन्य दलाने माघारी बोलावलं. कुटुंबापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत मनोज पाटील यांनी युद्धभूमीकडे कूच केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सत्यनारायणाचा विधी ज्या दिवशी होता त्याच दिवशी म्हणजे गुरुवार, दि. ८ मे रोजी ते देशसेवेसाठी रवाना झाले.
मनोज पाटील यांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर सर्व नातेवाईक हजर होते. असा क्षण वाट्याला आल्यामुळे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते. पत्नी यामिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तरीही त्यांनी मोठ्या धीराने आपल्या पतीला देशसेवेसाठी पाठवून दिलं.
यामिनी म्हणाल्या की, आज आमची सत्यनारायणाची पूजा होती. परंतु आम्ही देशसेवेसाठी पतीला पाठवत आहोत, त्यांचा मला अभिमान आहे. कुटुंबापेक्षा देशहित आणि देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहे.
मनोज पाटील यांचे वडीलदेखील भावुक झाले होते. ते म्हणाले, माझा मुलगा देशसेवेसाठी सीमेवर जातोय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या सुनबाईचं आम्हाला सहकार्य आहे, त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरुन आली आहे.
