महाराष्ट्रात कुठे कुठे होणार 7 मे रोजी युद्ध सराव? हल्ल्यापासून बचावासाठी केंद्राने दिले निर्देश
महाराष्ट्रात कुठे कुठे होणार 7 मे रोजी युद्ध सराव? हल्ल्यापासून बचावासाठी केंद्राने दिले निर्देश
मुंबई
देशभरातील एकूण २५९ ठिकाणी उद्या ७ मे रोजी युद्धसराव केला जाणार आसुन या सरावातून हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआउट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश केला जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रात कुठे होणार युद्धसराव?
राज्य | श्रेणी १ | श्रेणी २ | श्रेणी ३ |
महाराष्ट्र | मुंबई | ठाणे | औरंगाबाद |
उरण | पुणे | भुसावळ | |
तारापूर | नाशिक | रायगड | |
रोहा-नागोठणे | रात्नागिरी | ||
मनमाड | सिंधुदुर्ग | ||
सिन्नर | |||
थळ वायशेत | |||
पिंपरी चिंचवड |
भारताच्या सीमेवर असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यातील अनेक शहरात युद्धसराव केला जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मॉक ड्रील पार पडणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून युद्धसरावासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतातील २५९ ठिकाणी तीन श्रेणींमध्ये मॉक ड्रिल पार पडणार आहे. पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी १३ शहरे आहेत. दुसऱ्या श्रेणीत २०१ आणि तिसऱ्या श्रेणीत ४५ शहरे आहेत. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत येत आहेत. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे. तर उरण येथे माल वाहतूक करणारे जेएनपीटी बंदर आहे. तारापूर येथे अणुभट्टी असल्यामुळे या तीनही ठिकणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.
गृहखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, १९६८ यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित असा सराव आहे. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत? हे यातून दिसणार आहे.
मॉक ड्रिल कसे होणार?
७ मे रोजी ठरलेल्या शहर, जिल्ह्यात राज्य आणि जिल्ह्या यंत्रणेच्या समन्वयातून युद्धसराव केला जाईल. सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सरावासाठी सामावून घेतले जाऊ शकते.
युद्धसरावादरम्यान वीज खंडीत होणे, ब्लकआऊट, मोठ्या आवाजातील सायरन ऐकू येऊ शकतात. काही ठिकाणी सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी केली जाऊ शकते. काही शहरांमध्ये वाहतूक वळवली जाऊ शकते.
