बीडमध्ये ‘एसपीं’ना शिवीगाळ; पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे सेवेतून बडतर्फ
बीडमध्ये ‘एसपीं’ना शिवीगाळ; पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे सेवेतून बडतर्फ
बीड
रणजीत कासलेनंतर आता बीडच्या सायबर विभागातील आणखी एक पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
बीड पोलीस अधीक्षक ते पोलीस खात्यातील वरिष्ठांसह बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराडवर आरोप केल्याप्रकरणी बीडच्या सायबर विभागातील पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला आधीच खाकी वर्दी कायमची गमवावी लागली. आणि आता त्याच सायबर विभागातील पोलीस निरीक्षकालाही सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. सुनील नागरगोजे असे बडतर्फ केलेल्या या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
सुनील नागरगोजेला बडतर्फ का केलं?
नागरगोजे हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. बीडमधील सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना सुनील नागरगोजे यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना शिवीगाळ केली होती. तसेच बीड येथे नियुक्त असताना एका कार्यालयीन कर्मचाऱ्यालाही धमकी दिली होती. शिवाय, सातत्याने बराच काळ ते पोस्टिंगनंतर कर्तव्यावर म्हणजे ऑनड्युटी येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरवर्तणुकीचा अहवाल नंदकुमार ठाकूर यांनी वरिष्ठांना पाठवला होता. त्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे यावरुन पोलीस महासंचालक कार्यालयाने सुनावणी घेतल्यानंतर सुनील नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
LCB साठी होता नागरगोजे यांचा हट्ट
खरंतर पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोस्ट हवी होती. नेत्यांमार्फत त्यासाठी दबावही आणला होता. परंतु तरीही पोस्टिंग न मिळाल्याने सुनील नागरगोजे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक ठाकूर यांना शिवीगाळ केली होती. याशिवाय सुनील नागरगोजे यांची कारकीर्दही वादग्रस्त राहिलेली असल्याने त्यांच्यावर याआधीही शिस्तभंगासंदर्भात आरोप झाले होते. अखेर त्यांच्या एकूण वर्तणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यांना सेवेतूनच बडतर्फ केले आहे.
तरी, रणजित कासलेनंतर नागरगोजेच्या रुपानं बीड जिल्ह्यातल्या सायबर विभागातील दोन अधिकाऱ्यांना खाकी वर्दी कायमची गमवावी लागली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीसोबतच पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित होत आहे.
