Saturday, April 19, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

स्वाराती रुग्णालयात नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीची भर आ. नमिता मुंदडांच्या प्रयत्नांमुळे ७० लाख रुपयांची यंत्रसामुग्री मंजूर

स्वाराती रुग्णालयात नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीची भर

आ. नमिता मुंदडांच्या प्रयत्नांमुळे ७० लाख रुपयांची यंत्रसामुग्री मंजूर

अंबाजोगाई : येथील स्वाराती रुग्णालयात रुग्णसेवा अधिक सक्षम व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मोठी भर पडली आहे. रुग्णालयात नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम उपलब्ध झाली असून मायक्रो डीब्रायटर मशीनसाठी निधी मंजूर झाला आहे. रुग्णसेवा अद्ययावत करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी या दोन महत्त्वाच्या यंत्रसामुग्रीसाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

*मायक्रो डीब्रायटर मशीनसाठी ३० लाखांचा निधी मंजूर*
नाकातील विविध व्याधींवर अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मायक्रो डीब्रायटर मशीनसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या यंत्रासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यानंतर मशीन रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. या यंत्रामुळे नाकातील शस्त्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि परिणामकारक होतील.

*४० लाख रुपयांची एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम झाली उपलब्ध*
तसेच ४० लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली एंडोस्कोपिक कॅमेरा सिस्टीम देखील नुकतीच रुग्णालयात दाखल झाली आहे. लवकरच या यंत्राचे इन्स्टॉलेशन पूर्ण होणार असून त्यानंतर ती कार्यान्वित होईल. ही यंत्रणा नाकाच्या ऑपरेशनसाठी वापरण्यात येणार असून डॉक्टरांना अधिक स्पष्ट आणि सूक्ष्म निरीक्षण करता येणार आहे.

*रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण टप्पा*
या दोन्ही यंत्रांमुळे स्वाराती रुग्णालयात ईएनटी विभागातील (नाक, कान, घसा) शस्त्रक्रियेसाठी अत्यल्प दरातआधुनिक उपचार पद्धतींचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे शस्त्रक्रियांचे यशस्वी प्रमाण वाढेल तसेच रुग्णांना जलद बरे होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे अंबाजोगाई आणि परिसरातील रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

स्वाराती रुग्णालयात रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सदरील यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!