ताज्या घडामोडी

खाजगी रूग्णालयासारखी दर्जेदार सरकारी रूग्णालये बनविण्याची जबाबदारी कोणाची आहे..?  सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांचा सवाल

खाजगी रूग्णालयासारखी दर्जेदार सरकारी रूग्णालये बनविण्याची जबाबदारी कोणाची आहे..?

 सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांचा सवाल


=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सध्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरण खूप गाजत आहे. यामध्ये दोष कुणाचा, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, इथून ही चर्चा वाढत वाढत जाऊन सर्वसामान्य स्तरावर खाजगी रूग्णालये कशी पेशंटची अडवणूक करतात, त्यांना नको त्या तपासण्या करायला लावतात, अव्वाच्या सव्वा फीस आकारतात, डॉक्टर्स हे राक्षस झालेले आहेत. इथपर्यंत पोहचलेली आहे. येणारे काही दिवस ही चर्चा, मीडिया ट्रायल सगळं घडवून आणलं जाईल. लोकांमध्ये डॉक्टर्सविरूद्धच वातावरण तापविण्यात येईल आणि काही दिवसांनी हा विषय संपून राजकारण्यांना सोयीचा असलेला, राजकीय फायदा मिळू शकत असलेला दुसरा विषय पुढे आणण्यात येईल. या प्रकरणाच पुढे काय झालं, पीडितांना न्याय मिळाला का नाही ? याचा मागोवा सुद्धा घेण्याची तसदी काही काळानंतर आता बेंबीच्या देठापासून ओरडणारे घेणार नाहीत.

या विषयावर लिहायचं कारण असं की, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा करीत असताना भारत कसा महासत्ता बनत आहे. याच्या पोकळ वल्गनाच सरकार द्वारे केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारताला आजही अन्न, वस्त्र, निवारा, वीज, दळणवळण सोयी, मोफत दर्जेदार शिक्षण, पक्के रस्ते, मूलभूत दर्जेदार आरोग्य सुविधा या मूलभूत हक्कांच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत हे कटुवास्तव एकिकडे आ वासून उभे आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याची निष्पक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा व्हावी यात कोणाच्याही मनात दुमत नाही. परंतु, पुण्यात महाराष्ट्रात गाजलेले शासकीय ससून रूग्णालय असताना देखील लोकांना खाजगी रूग्णालयातच जाऊन आपल्या रूग्णाचा विलाज करावा वाटणे ही शासकीय आरोग्य व्यवस्थेची झालेली दुर्दशा वाताहत आहे. लोकांचा विश्वास आज या मोडक्या तोडक्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेवर राहिलेला नाही याचे द्योतक आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोरोना काळात शासकीय आरोग्य व्यवस्थेचे निघालेले वाभाडे आणि त्याकाळात खाजगी रूग्णालयाची, खाजगी डॉक्टर्सची शासकीय यंत्रणेला अगतिकतेने, हतबलतेने मदत घ्यावी लागली हे आहे. त्यावेळी सर्व खाजगी रूग्णालयांनी खाजगी डॉक्टर्सनी सुद्धा मागेपुढे न पाहता शासनाला आरोग्य व्यवस्थेला मदत केली. मग प्रश्न हा उरतो की खाजगी रूग्णालयात जशी वेळीच दर्जेदार, उत्तम, आरोग्य सुविधा मिळते तशी सुविधा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सर्वसामान्य रूग्णाला का मिळत नाही..? शासकीय रूग्णालये खाजगी रूग्णालयाप्रमाणे दर्जेदार बनविण्याची जबाबदारी इथल्या सरकारची आहे का.. पाकिस्तानच्या सरकारची हा प्रश्न निर्माण होतो. परवडतील अशा दरात आरोग्य सुविधा मिळणे हा प्रत्येक रूग्णाचा हक्क आहे आणि तो देणे हे सरकारचे बंधनकारक कर्तव्य आहे. तो जर मिळत नसेल तर याचा जाब कुणाला विचारायला पाहिजे आणि कोण याला उत्तर देण्यास जबाबदार आहे याचा खुलासा झाला पाहिजे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या घडलेल्या दुःखद घटनेच्या निमित्ताने एक मोठा गैरसमज सर्वसामान्य जनतेच्या मनात पेरला जातं आहे. मुळात हे समजून घेतले पाहिजे की खाजगी रूग्णालय ,खाजगी डॉक्टर्स व दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यासारखे धर्मादाय हॉस्पिटल किंवा धनदांडग्या लोकांनी काढलेल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय पण, कॉर्पोरेट रूग्णालय आहे. यामध्ये एक विश्वस्त समिती असते. अशी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स एखाद्या कंपनी प्रमाणे हे रूग्णालय कामं करत असते. यामध्ये जसा कंपनीचा मालक आपल्या कंपनीला फायदा होण्याच्या दृष्टीने विविध पगारी लोक आपल्या कंपनीत ठेवत असतात, विविध प्रकारचे नोकर, कंपनीच्या फायद्याच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा कंपनीमध्ये नोकरीसाठी ठेवतात. तसेच या कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये या संस्थांचा फायदा होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले डॉक्टर्स, नर्सेस, विविध कर्मचारी ही विश्वस्त मंडळी आपल्या रूग्णालयासाठी पैसे देऊन पगारी नोकर ठेवल्यासारखे ठेवत असतात. हे विश्वस्त मंडळ रूग्णालय प्रशासन कारभार चालवत असते. कोणत्या रूग्णाला भरती करायचे, कोणत्या रूग्णाला भरती करायचे नाही, कुणाकडून किती पैसे घ्यायचे, कुणाला किती सवलत द्यायची हे सर्व या सर्व बाबी ही प्रशासन विश्वस्त मंडळ आखून देत असते व त्याबरहुकूम त्यांची हि नोकर मंडळी कामं करत असते. या विश्वस्त मंडळात अनेक राजकारणी अनेक नेते, अनेक पुढारी, अनेक धन दांडगे, अनेक व्यापारी, एखादा धनाढ्य डॉक्टर अशी मंडळी समाविष्ट असतात. अशा प्रकारे बनलेले हे विश्वस्त मंडळ एखाद्या धंद्यामध्ये जसा पैसा गुंतवून पैसा मिळवितात त्यादृष्टीने कामं करत असतात. त्यांचा हा पैसे कमविण्याचा धंदा झालेला आहे. यामध्ये तिथे कामावर असणाऱ्या डॉक्टरचा कसलाच दोष नसतो. ते बिचारे पगारी नोकरदाराप्रमाणे आपली ड्युटी करून महिन्याला पगार उचलत असतात. या निमित्ताने हा प्रश्न निर्माण झाला आहे. की, आता वैद्यकीय क्षेत्रात अशा धंदेवाईक प्रवृत्ती आल्याने याचा डॉक्टर्स-रूग्ण नातेसंबंधावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि उपचार करून घेणाऱ्या रूग्ण आणि नातेवाईक यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते आहे. ते भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. उपचार करून घेणाऱ्या रूग्णाचा त्याच्या डॉक्टरवर पूर्णपणे विश्वास पाहिजे तरच उपचार यशस्वीपणे पार पडू शकतो. परंतु, वैद्यकीय क्षेत्र हे आर्थिक फायद्याचे क्षेत्र आहे हे ओळखून यात धनदांडग्या लोकांचा, नेत्यांचा, राजकारणी लोकांचा झालेला प्रवेश ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अशा कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा कावा लोकांनी ओळखला पाहिजे. आजही खाजगी डॉक्टर्सद्वारे चालविण्यात येत असलेले बहुसंख्य छोटे मोठे दवाखाने माणुसकीचे मूल्य जपून, वैद्यकीय सेवा हे व्रत समजून रुग्णांचा उपचार करीत आहेत. आतातर सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे आता ही खऱ्या अर्थाने सेवा देणारे छोटे मोठे दवाखाने बंद पाडून पैशासाठी रूग्णांना अडविणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासारखी कॉर्पोरेट हॉस्पिटल ज्याचे मालक अंबानी अडाणी सारखे धनदांडगे उद्योजक असतील अशी रूग्णालये उभी करण्याचा घाट घालत आहे. म्हणजे यापुढे गल्लीबोळात, सहज उपलब्ध होणारी, रूग्णाच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे डॉक्टर यांचे हॉस्पिटल बंद पाडून अशा डॉक्टर्सला या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यास भाग पाडून त्यांची गल्लीबोळात मिळत असणारे स्वस्तातली वैद्यकिय रूग्णसेवा महाग करून रूग्णांकडून पैसे उकळण्याचा डाव शासकीय यंत्रणा व सरकारचा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी आपला उपचार महागड्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये करायचा का तुमच्याशी जिवाळ्याचे संबंध असणाऱ्या एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे करायचा हा प्रश्न यानिमित्ताने उभा झालेला आहे. त्यामुळे भविष्यातील आरोग्य व्यवस्थेला निर्माण होत असलेला हा धोका सर्वसामान्य लोकांनी आताच ओळखला पाहिजे व याला विरोध केला पाहिजे, अन्यथा भविष्यात आपल्या आरोग्यासाठी आपल्याला न परवडणारी आरोग्यसेवा या कॉर्पोरेट हॉस्पिटल कडून बळजबरीने घ्यावी लागेल. कारण, तुम्हाला आत्ता मिळत असलेली स्वस्तातले आरोग्यसेवा बंद करण्याचा डाव या सरकार द्वारे या यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला स्वस्तात सेवा देणाऱ्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीला सरकारने बंद पाडून अंबानी सारख्या लोकांना या क्षेत्रात हुकूमत करायच रेड कार्पेट अंथरूण बीएसएनएल ही शासकीय सेवा कायमची बंद करून टाकली तशीच अवस्था जिल्हा परिषद शाळांची करून या शाळाही खाजगी कंत्राटदारांना देण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने अजून एक प्रश्न पुढे आलेला आहे तो म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये आपले आरोग्या विषयी असलेली बेफिकिरी ज्यामुळे रूग्ण गंभीर अतिगंभीर होईपर्यंत त्याच्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही आणि ज्या वेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेस आपण एकदम सजग, सावध, भावनिक होवून रुग्णाला रुग्णालयात घेवून जातो आणि तिथे रुग्ण ताबडतोब बरा व्हावा अशी अपेक्षाही करतो. मात्र बऱ्याच वेळा रूग्णाचे अवस्था अत्यंत गंभीर असल्याने, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डॉक्टरांनी केलेलं उपचार व्यर्थ ठरतो आणि रुग्णाच्या जीवावर बेतते. अशावेळी रूग्णाच्या नातेवाईकांच्या संयमाचा बांध फुटून हॉस्पिटलची तोडफोड डॉक्टर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांना मारहाण असे प्रकार घडतात. यामध्ये नेमका दोष कुणाचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ एखादा पेशंट गेल्या अनेक वर्षांपासून दारू पीत असतो किंवा तंबाखू खात असतो एक दिवस असा येतो की ज्यामध्ये त्याची लिव्हर इतके खराब होते तिथे काम करणे सोडून देते, त्याच्यामध्ये पाणी व्हायला सुरूवात होते आणि मग पोट फुगण्यास सुरूवात होते रुग्णाची परिस्थिती गंभीर बनते आणि तो रूग्ण दवाखान्यामध्ये आणला जातो, ज्याला सिरोसिस ऑफ लिव्हर असं म्हणलं जातं. रूग्ण दवाखान्यात भरती केल्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांना तो रूग्ण आता तात्काळ बरा होईल अशी अपेक्षा असते. परंतु, वर्षानुवर्ष पिलेल्या दारूमुळे लीवर उपचाराच्या पलीकडे गेलेले असते. अशावेळी त्या रूग्णाचा अचानक मृत्यू होतो आणि हा धक्का न सहन झाल्याने रूग्ण तर चालत आला होता आणल्यानंतर रूग्ण बोलत होता. परंतु, डॉक्टरांनी रूग्णालयाने उपचारात हलगर्जीपणा केल्याने किंवा एखाद्या चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाला असे सरास म्हणले जाते. परंतु तो रूग्ण वर्षानुवर्षी दारू पीत होता. त्यावेळी त्या रूग्णाला, त्याच्या नातेवाईकालाही दारू पिल्याने लिव्हर खराब होते हे माहीत असूनही तो पितो यावर आधीच प्रतिबंध करावा अस वाटत नाही. यामध्ये दोष कुणाचा तसेच तंबाखू खात असलेल्या रूग्णांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कॅन्सर होतो. हे माहीत असते तरीसुद्धा ते खातच राहतात आणि कॅन्सर झाल्यावर त्याचा त्वरित उपचार व्हावा आणि रूग्ण ठणठणीत बरा व्हावा अशी केलेली अपेक्षा किती संयुक्तिक आहे. याचा विचार प्रत्येकाने मनात करावा. वैद्यकीय शास्त्र हे इतर शास्त्राप्रमाणेच एक अपूर्ण शास्त्र आहे दर दिवशी या शास्त्रात नवीन प्रयोग होत असतात नवीन उपचार पद्धती येत असते. डॉक्टर्स आपल्या परीने या संशोधनाचा अत्याधुनिक उपचार पद्धतीचा समाजाच्या हिताच्या दृष्टीने कसा फायदा करून दिला जाईल याचा विचार करून आपल्या रूग्णाचा उपचार करत असतो. त्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो आणी जगातल्या प्रत्येक डॉक्टरला आपला रूग्ण ठणठणीत बरा व्हावा असच वाटत असते आणि तो यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतो हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही बाब लक्षात ठेवून आपल्या सारासार विचार बुद्धीचा उपयोग करून आपला संयम राखून रुग्णाचा उपचार करून घ्यावा. त्यासाठी डॉक्टर्सला योग्य ते सहकार्य करावे. डॉक्टर्सवर दबाव येऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या निमित्ताने अजून एक प्रश्न पुढे आलेला आहे तो असा की, भारतामध्ये गरीबी आणि आर्थिक चंगळ हा प्रश्न ८० टक्के लोकांकडे आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आरोग्य विमा कवच घेणे अत्यंत अत्यावश्यक झालेले आहे. परंतु, एका संशोधनामध्ये लोकसंख्येच्या फक्त ३८ टक्के लोकांनी आरोग्य विमा कवच घेतल्याचे सिद्ध झाले आहे. मग एखादी वैद्यकीय अत्यावश्यक परिस्थिती आपल्या घरी ओढवल्यास या आर्थिक प्रश्नाला कसे उत्तर द्यायचे हे गणित त्या परिस्थितीत खूप अवघड होऊन बसते. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य ही आपली जबाबदारी हे ओळखून घेऊन वेळीच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच वेळीच आरोग्य विमा कवच काढणे गरजेचे आहे. या निमित्ताने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर आगपाखड करणाऱ्या, आंदोलने करणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांची, पुढार्‍यांचे किती नातेवाईक शासकीय रूग्णालयामध्ये आरोग्य सेवा घेण्यासाठी जातात हा ही एक मोठा संशोधनाचा विषय आहे आणि जर ते जात नसतील मग या आंदोलनकर्त्यांनी या शासनाला हा प्रश्न विचारला पाहिजे की खाजगी रूग्णालयासारखी तोडीची शासकीय रूग्णालय तुम्ही कधी निर्माण करणार आहात ज्याद्वारे सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा ही त्यांच्या परवडणाऱ्या दरात असेल..? आपल्याला परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळणे हा रूग्णाचा तथा सर्वसामान्य जनतेचा जसा हक्क आहे तसेच ही आरोग्यसेवा शासनातर्फे उपलब्ध करून देणे हा शासनाचे परम कर्तव्य आहे. हे परम कर्तव्य शासन स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे पूर्ण झाली तरी सुद्धा देऊ शकत नाही हे या शासनाचे अपयश आहे. या अपयशाला झाकण्यासाठी असे प्रकरण घडल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी त्या रूग्णालयाच्या नावाने ओरड करायची, खाजगी रूग्णालयाच्या नांवाने बोंब मारायची, एखाद्या दुसरया डॉक्टरवर कार्यवाही करायची मात्र त्याच वेळेस शासनाची स्वतःची आरोग्य व्यवस्था त्याचे किती दयनीय हाल झाले आहेत, सर्वसामान्य जनतेचा शासकीय रुग्णालयांवर विश्वास राहिला नाही आणि आपल्या फायद्यासाठी हे आरोग्य व्यवस्था धनदांडग्या लोकांच्या हाती देऊन लोकांच्या नांवाने चांगभलं असं म्हणत वड्याचे तेल वांग्यावर असं म्हटल्याप्रमाणे हे शासन वागत आहे. याचाही कुठेतरी उपचार झाला पाहिजे आणि सलाईनवर असलेले शासकीय दवाखाने दर्जेदार करण्यावर भर दिला पाहिजे असे वाटते. ही बातमी लिहिपर्यंत अजून एक बातमी आली की, रामनवमीच्या निमित्त शिर्डीत ५१ भिक्षेकरी आढळले. त्यापैकी १३ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४ जण मृत्युमुखी पडले. ही अवस्था शासकीय रूग्णालयांची आहे. त्यामुळे शासनाने आपल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे वाटते.

=======================

=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!