Monday, April 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

भाविकांनी भरलेली बस भररस्त्यात पेटली, 40 प्रवासी बालंबाल बचावले

भाविकांनी भरलेली बस भररस्त्यात पेटली, 40 प्रवासी बालंबाल बचावले

हिंगोली (प्रतिनिधी)

    औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील वगरवाडी शिवारात सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस भररस्त्यात पेटली. या बसमधून तब्बल 40 भाविक प्रवास करत होते. पण सुदैवाने त्यातील कुणीही जखमी झाले नाही. ते सर्वजण सुखरुप आहेत. पण त्यांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना केले.

    कर्नाटक राज्यातून एक बस सुमारे 40 भाविकांना घेऊन औंढा नागनाथच्या दिशेने येत होती. सदर बसमध्ये भाविकांसह त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे साहित्यही होते. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सदर बस वसमतकडून औंढा नागनाथकडे येत होती. यावेळी वगरवाडी शिवारात बसच्या पाठीमागील भागातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चालकाने तातडीने बस थांबवून भाविकांना खाली उतरविले. यावेळी परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले व काही साहित्यही बाहेर काढले. दरम्यान, बघता – बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, बंडू काळे, नगरसेवक राम मुळे, किरण घोंगडे, शेख अन्वर पठाण, आसेफ कुरेशी, शेख सोहेल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाणी ओतून बसची आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगर पंचायतीचे अग्‍निमनदल घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्याचे काम सुरु अद्याप सुरू आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने तहसीलदार डॉ. हरीष गाडे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना घटनास्थळी रवाना केले आहे. महसूल प्रशासनाने या भाविकांच्या भोजन व निवासाची सोय करण्याचे काम सुरु केले आहे. सदर खाजगी बस कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सुत्रांनी सांगितले. कर्नाटक येथून रविवारी दुपारी भाविक निघाले होते. त्यानंतर सोमवारी हा प्रकार घडला. बसमधील वायरींगमुळे आग लागली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!