तेजस्वी होण्यासाठी स्वतःला सुर्यासारखं जाळून घ्यायला शिकलं पाहिजे – डॉ.राजेश इंगोले
तेजस्वी होण्यासाठी स्वतःला सुर्यासारखं जाळून घ्यायला शिकलं पाहिजे – डॉ.राजेश इंगोले

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सूर्य बनने सोपे नाही आपल्याला सुर्यासारखं तेजस्वी व्हायचं असेल तर आधी स्वतःला सुर्यासारखं जाळून घेता आल पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले. जिजाई इंग्लिश स्कुलच्या विज्ञान प्रदर्शनात ते उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, सचिव सुरेश कदम, सुशांत कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल मोरे, महावीर गोडभरले, हेमंत धानोरकर, आर डी जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती तथा महान वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम व शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन व फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.राजेश इंगोले यांनी विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना अनुभव समृद्ध शिक्षण देते. जगात झालेले विविध संशोधन, नवनिर्मिती याचा अभ्यास करून हे प्रयोग प्रदर्शित केले जातात. असे प्रदर्शन हे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवतात त्यांच्यातील निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता, संशोधक वृत्ती, जिज्ञासा आणि नवनिर्मितीच्या कुशलतेला वाव देतात. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे भक्कम पुरावा आणि तर्कावर आधारित विचार करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिकण्याची एक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. पुढे बोलतांना डॉ.इंगोले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हा तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, प्रमानित, प्रयोगशील, दैनंदिन जीवनातील घटनांवर लागू केला जातो तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन हा विज्ञानाच्या पद्धतींवर आधारित असतो. आणि अशी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारलेली पिढी खऱ्या अर्थाने समृद्ध आणि विज्ञानवादी असते आणि हीच पिढी भारताला जागतिक महासत्ता बनवू शकते. त्यामुळे पालकांनी, शिक्षणसंस्थानी विद्यार्थ्यांना परंपरेला प्रश्न विचारणारी पिढी तयार केली पाहिजे असे आवाहन डॉ.इंगोले यांनी केले. यावेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष रमेश कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असते त्यांना संधी देण्याचे काम आपली संस्था करीत असल्याचे सांगितले. यावेळी महावीर गोडभरले, हेमंत धानोरकर, आर.डी.जोगदंड यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी केलेले विविध प्रयोग समजून घेत विद्यार्थ्यांना प्रयोगविषयी विविध प्रश्न विचारले. या विज्ञान प्रदर्शनात जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा गुरसुलकर तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका शितल मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव सुरेश कदम, सुशांत कदम व शाळेच्या सर्व कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले.
==================
=======================
