पत्नीकडून पतीचा खून, तपासात धक्कादायक माहिती उघड
पत्नीकडून पतीचा खून, तपासात धक्कादायक माहिती उघड
पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून एका व्यक्तीची दगडाने आणि लाकडी दांडक्याने रवींद्र काशिनाथ काळभोर हे घराबाहेर झोपलेले असताना वार करून हत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील लोणी काळभोर परिसरात वडाळे वस्ती येथे राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री ११ च्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
पोलिसांनी याप्रकरणी रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (४२) आणि गोरख त्रंबक काळभोर (४१) यांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहितीही समोर आली.
रवींद्र काळभोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला, तसेच शेजाऱ्यांकडे याबद्दलची चौकशी केली. यावेळी पोलिसांना रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली. यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सुरुवातीला त्या दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला.
शोभा आणि गोरख यांच्यातील अनैतिक संबंधांना रवींद्र अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला. यानंतर सोमवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करत रवींद्र यांना संपवलं. यानंतरही शोभा आणि गोरख दोघेही काहीच घडले नाही, असे वागत होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.
काळभोर पोलिसांकडून तीन तासात तपास
या घटनेने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. सध्या दोन्ही आरोपींवर पुढील कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
