बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचे वृत्त नेमकं घडलं काय
बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचे वृत्त नेमकं घडलं काय
बीड
ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत, त्याच जेलमध्ये राडा झाल्याचे आणि यात वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आसून तुरुंग प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड ने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत. त्यामुळे त्यांना झापडझुपड झाली असेल, असं ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे. जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळी नाष्ट्याच्या वेळी गित्ते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धाऊन गेले. त्यावेळी सुदर्शन घुले तिथेच होते. तो मध्ये पडला, त्यामुळे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण केली, अशी माहिती आहे.
वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हलवलं जाण्याची शक्यता आहे. कारण जेलमध्ये दोन टोळ्या झाल्याची माहिती आहे. एक टोळी वाल्मिकची आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यांची, असं वृत्त आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जेल प्रशासन सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतं.
संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि गँग लीडर सुदर्शन घुले हे बीडच्या जेलमध्ये आहेत. बीडच्या जेलमध्ये या दोघांना एकत्रित ठेऊ नये, अशी मागणी यापूर्वीच झालेली होती. परंतु तुरुंग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. तर आरोपी विष्णू चाटे हा लातूरच्या तुरुंगात आहे. जेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर तरी हे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.