खोक्याला व्हिआयपी ट्रिटमेंट देणं आलं अंगलट, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले दोन पोलिसांचे निलंबन, वरिष्ठा वर ही होणार कार्यवाही?
खोक्याला व्हिआयपी ट्रिटमेंट देणं आलं अंगलट, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले दोन पोलिसांचे निलंबन, वरिष्ठा वर ही होणार कार्यवाही?
बीड (प्रतिनिधी)
बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहा बाहेर सतीश भोसले उर्फ खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आल्यानंतर व कारागृहाबाहेर मित्र, कुटुंबीयांसोबत घरच्या जेवणावर आडवा हात मारणाऱ्या खोक्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर एकच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. पोलिसांवर टीकास्त्र सुरू होताच, जिल्हा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी या प्रकरणात अखेर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
दोन पोलिसांचे निलंबन…
सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ वायरल झाला होता. याच घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी
असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे.
दोन पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर त्याबरोबरच ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
खोक्याची कारागृहाबाहेर पार्टी…
सतीश भोसले उर्फ खोक्या याचे राजकीय लागेबंद असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता त्याला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेला व्हिडीओ हा सोमवार, दुपारचा असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ नुसार, पोलिसांनी खोक्याला तुरुंगाबाहेर आणले. त्यानंतर तो थाटात
पोलिसांच्या कोंडाळ्यात उभा असलेला दिसत आहे. याठिकाणी खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिनधास्तपणे भेटताना दिसत आहेत. या भेटीगाठीसाठी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यावेळी खोक्या भाई बिनधास्त फोनवर बोलतानाही दिसत आहे.
व्हिडीओनुसार काही जण खोक्याची भेट घेत आहेत. त्याशिवाय घरून आणलेल्या जेवणावर आडवा हात मारताना खोक्या दिसत आहे. आरोपी असलेल्या खोक्याची शाही बडदास्त का ठेवण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला.
