संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान भावूक! कडकडून मिठी मारली
संतोष देशमुखांच्या मुलाला भेटून हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान भावूक! कडकडून मिठी मारली
पुणे (प्रतिनिधी)
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यातील राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्र ढवळून निघालेलं असतानाच दिवगंत संतोष देशमुखांच्या मुलाची अभिनेता आमिर खानने पुण्यात घेतलेल्या भेटीदरम्यान आमिर खान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 105 दिवस पूर्ण झाले आसताना या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करुन खटला सुरु असला तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही
कडाडून मिठी
पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळेस संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखसुद्धा विराजसोबत होते. आमिरने या दोघांचंही सांत्वन केलं. या भेटीदरम्यान आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भाऊक झाला होता. त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख याला कडाडून मिठी मारली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
किरण रावने दिला सल्ला
आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना, ‘हिंमत कायम ठेवा’ असा सल्ला दिला. त्यावर आमिरनेही, ‘होय’ असं म्हणत किरण यांच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवलं
मस्साजोगसाठी ‘नाम’ आणि ‘पाणी’ फाउंडेशन एकत्र
सध्या मस्साजोग गावात आमिर खानच्या नेतृत्वाखालील ‘पाणी’ फाउंडेशन आणि अभिनेते नाना पाटेकर तसेच मकरंद अनासपुरे यांच्या नेतृत्वाखालील ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचे काम सुरू आहे. मस्साजोग गाव पाणीदार करण्यासाठी ‘नाम’ आणि ‘पाणी’ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाच या गावातील तरुणांसाठी उभा राहणारा संतोष देशमुखसारख्या हुशार आणि कष्टाळू सरपंचाबरोबर काय काय घडलं हे ऐकून आमिरही अस्वस्थ झाल्याचं बालेवाडीतील भेटीदरम्यान दिसून आलं.
