छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवल्याने तरूणाला जमावाकडून मारहाण, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवल्याने तरूणाला जमावाकडून मारहाण, गुन्हा दाखल
गंगाखेड (प्रतिनिधी)
गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्ली मधील तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत स्टेटस ठेवला म्हणून जवळच असलेल्या राज मोहल्ला येथील जमावाने त्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक काळे यांनी भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
अविनाश उमा खवडे (वय २२, रा. नगरेश्वर गल्ली, गंगाखेड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दुपारी त्याने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार व औरंगजेबचा फोटो असलेली स्टोरी ठेवली होती. या रागातून रात्री साडेआठ वाजता फैजल याने तुला तौफिकने बोलावल्याचे सांगत मस्जिदकडे बोलावले. त्याठिकाणी आणखीन मुले जमवत असल्याचे बघून अविनाश नगरेश्वर गल्लीतील महादेवाच्या मंदिराजवळ गेला. तिथे आयान रिजवान, फैजल याच्यासह चार ते पाच जण आले व त्यांनी तू स्टोरी का ठेवली? म्हणून मारहाण केली. यावेळी मंदिराजवळ उपस्थित असणाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. गोंधळ वाढत असल्याने अविनाश याने पोलीस स्टेशन गाठले.
त्याच्या फिर्यादीवरून आयान, रिजवान, फैजल (सर्व रा. राज मोहल्ला) याच्यासह अनोळखी एक, अशा चार जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत. रात्री प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
