ताज्या घडामोडी

*पायाभूत सुविधा मिळाल्याशिवाय उद्योग जगताला चालना मिळणार नाही – ॲल्युमिनियम मॅन इंजि.भरत गित्ते*

*पायाभूत सुविधा मिळाल्याशिवाय उद्योग जगताला चालना मिळणार नाही – ॲल्युमिनियम मॅन इंजि.भरत गित्ते*


———————————————
*अंबाजोगाईत दैनिक वार्ताचा १७ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण* *सोहळा उत्साहात संपन्न*
———————————————


उद्योजक लक्ष्मण मोरे यांना नगरभूषण, सतीश बनसोडे यांना सद्भावना तर सुजित ठाकूर (दिख्खत) यांना युवा गौरव पुरस्काराचे थाटात वितरण
———————————————

*अंबाजोगाई /प्रतिनिधी*
आज मराठवाड्याची व विशेषतः ग्रामीण भागाची परिस्थिती सुधारली पाहिजे,ग्रामीण भाग अर्थसंपन्न झाला पाहिजे आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे पण ग्रामीण भागात उद्योजकांना किंवा बाजारपेठेला जशा पायाभूत सुविधा लागतात तशा सुविधा मिळत नाहीत. उद्योग जगताला पायाभूत सुविधा मिळाल्या तरच रोजगाराची संधी आणि ग्रामीण भाग समृद्ध होईल अशी अपेक्षा जर्मनीचे उद्योजक व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र इंजि.भरत गित्ते यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई येथे दैनिक वार्ताच्या 17 व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वार्ता समूहाचा नगरभूषण पुरस्कार उद्योजक लक्ष्मणराव मोरे, सद्भावना पुरस्कार सतीश बनसोडे यांना तर युवा गौरव पुरस्कार युवा उद्योजक सुजितसिंह ठाकूर (दिक्खत)यांना प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर (पापा) मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.आय.खडकभावी केज च्या नगराध्यक्ष सौ. सीताताई बनसोड, उद्योजक प्रतापराव पवार, केज येथील जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक हारूनभाई इनामदार, पुणे येथील अर्थोसर्जन डॉ. सचिन नागापूरकर, आय.एम.ए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे,सामाजिक कार्यकर्ते प्रा.ईश्वर मुंडे, मधुमेहतज्ञ डॉ.अतुल शिंदे यांच्यासह पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मोरे यांचे चि .प्रवीण मोरे, सतीश बनसोडे, सुजित दिखत तसेच सत्कारमूर्ती इंजि.अमित राजेभाऊ लोमटे, इंजि.श्रीनाथ बापूराव गित्ते, इंजि.सहदेव नरसोबा केंद्रे, दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ व त्यांचेच कार्टूरुपी चित्र देण्यात आले.यावेळी उद्योजक इंजि.भरत गित्ते यांनी परळी,लातूर, पुणे ते जर्मनी असा प्रवास सांगून त्यादरम्यानच्या काळातील आठवणींना उजाळा दिला तर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना समर्पक आणि दिशादर्शक उत्तरे दिली. यावेळी बोलताना इंजि.गित्ते म्हणाले की, घरातील वातावरण तसे प्रतिकूल म्हणजे खूप सामान्य होते. घरात शिकलेले कोणीही नव्हते जेमतेम शिक्षण झालेले वडील होते. मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी गाव सोडले आणि परळी गाठले. परळीत हाती पडेल ते काम करून आम्हा भावंडांना शिकवले व सामर्थ्यशाली बनवले. परळीत माध्यमिक पर्यंत शिक्षण घेऊन लातूर येथे बारावीपर्यंतचे तर पदवीचे शिक्षण पुणे येथे घेऊन नामांकित अशा कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली पण स्वतःच काहीतरी असलं पाहिजे ही सारखी इच्छाशक्ती बळावत होती. तेथून जर्मनी गाठले आणि त्या ठिकाणी व इतर काही देशात जाऊन ॲल्युमिनियम स्पेअर पार्ट बनवण्याचे प्रशिक्षण घेतले व जर्मनीत उद्योग सुरू केला. 2016 साली ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याला प्रेरित होऊन भारतात येऊन भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा निर्णय घेतला.त्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थ साथ दिली व महाराष्ट्रात चाकण (पुणे )येथे कंपनी सुरू केली.महाराष्ट्र व मराठवाडा भागातील तरुणांमध्ये तरुणांमध्ये मोठी जिज्ञासा आहे, काम करण्याची तयारी आहे, संघर्ष करून भिडण्याची इच्छाशक्ती आहे. परंतु त्या ठिकाणी तरुणांना जे मार्गदर्शक किंवा सहकार्य करण्यासाठीची जी व्यवस्था लागते त्यासाठी सहकार्य मिळत नाही. म्हणून अनेक जण हाताश होतात. मलाही त्या संकटाचा सामना करावा लागला, पण हार मानली नाही. प्रत्येक आव्हानाला तोंड देत वाटचाल सुरू राहिली .तरुणांनी नाउमेद न होता मोठ्या आत्मविश्वासाने तयारी करावी आणि उद्याच्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी ठेवली तर यश तुमच्या पदरात आहे.मराठवाड्यात मोठे मागासले पण आहे त्याला कारणीभूत ही इथली व्यवस्था आहे. शासनाने उद्योजकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर उद्योजक ग्रामीण भागाकडे यायला वेळ लागणार नाही.उद्योजकांना चांगले रस्ते,दळणवळणाची प्रभावी साधने, अपेक्षित जागा, भरपूर वीज व इतर प्रकारचे सहकार्य अपेक्षित असते.परंतु या गोष्टी मिळत नाहीत म्हणून उद्योजक इकडे यायला धजावत नाहीत. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला ठेवून परिस्थितीशी दोन हात करून पुढे येण्याची तयारी दर्शवली तर जग आपल्या मुठीत असल्याचे इंजि.भरत गीते यांनी सांगितले.


यावेळी प्राचार्य डॉ.बी.आय, खडकभावी बोलताना म्हणाले की, वार्ता समूहाने सातत्याने चांगुलपणाचा गौरव आणि कौतुक केले आहे. समाजात जी मंडळी चांगले काम करते आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचा प्रयत्न असतो. अध्यक्षीय समारोप करताना अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की, दैनिक वार्ता समूहाने अंबाजोगाई व परिसरातील ज्या मंडळींनी समाजात असेल, व्यवसायात असेल किंवा उद्योग जगतात असेल अशा गुणीजनांचा सन्मान करून त्यांची पावले अंबाजोगाईकडे वळवण्याचे काम केले आहे .गेल्या 17 वर्षापासून हा कौतुकाचा व सन्मानाचा यज्ञ अखंडितपणे सुरू आहे. समाजात आज एखाद्याला चांगले म्हणण्याचे औदार्य सुद्धा दिसून येत नाही पण वार्ता समूहाने या गावच्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. सामाजिक जाणीवा जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा वार्ता समूहाचा प्रयत्न आहे असे उपक्रम म्हणजे अंबाजोगाईचा गौरव असल्याचे मोदी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी करताना सांगितले की, अंबाजोगाईच्या या पवित्र भूमीने अनेक चांगले व कर्तबगार व्यक्तिमत्व दिले आहेत ज्यांच्या कार्याचा डंका राज्यभर,देशभर व जगात गाजलेला आहे. कर्तुत्वानाचा गौरव आणि सन्मान केल्याने त्यांनाही काम करण्याची प्रेरणा मिळते व त्यांच्यातील कामाचे मनोबल वाढते अंबाजोगाई ही रत्नांची खाण असून याच अंबाजोगाईने वेगवेगळ्या क्षेत्रात राज्याचे व देशाचे नेतृत्व केले आहे. म्हणून वार्ता समूह हा सातत्याने चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. मायभूमीतील माणसाचा मायभूमीकडून सन्मान करण्याचा प्रयत्न असतो असे संपादक परमेश्वर गित्ते यांनी सांगितले. प्रारंभी स्व. द्रोपदीबाई गित्ते यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. महागायक सुभाष शेप व मयुरी मजगे यांनी जय.. जय.. महाराष्ट्र माझा हे राज्य गौरव गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली .कार्यक्रमाचे संचलन ह. भ. प.गोविंद महाराज केंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन जगन बापू सरवदे यांनी केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!