औरंगजेबच्या कबरीचा वाद! नागपूरमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा, जाळपोळ, दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
औरंगजेबच्या कबरीचा वाद! नागपूरमध्ये दोन गटामध्ये तुफान राडा, जाळपोळ, दगडफेक; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
नागपूर
औरंगजेबच्या कबरी वरून नागपूरच्या महाल परिसरामध्ये दोन गटात तुफान राडा झाला असुन दोन गट समोरासमोर भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाल्याने आणि संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक व जाळपोळ करत दोन गट एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
जमावाने पोलिसांवरही दडफेक केली आहे. यात काही पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. छ. शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये ही घटना घडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं.
पोलिस अधिकारी राहुल माकणीकर म्हणाले की, नागपूर हे सलोख्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. झालेल्या गोष्टी विसरुन दोन्ही गटाने शांतता राखावी. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियंत्रित बळाचा वापर करण्यात आलेला आहे. आता सर्वांनी शांतता पाळावी.
छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी नागपूरमध्ये सोमवारी हिंदू संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी दोन गट समोरासमोर भिडले. दगडफेक, जाळपोळ आणि जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी जमावाला शांत करण्यासाठी बळाचा वापर केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर दहा वाजण्याच्या दरम्यान हिंसा थांबली. तरीही पोलिसांनी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन आंदोलकांना शांत केलं.
औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी लाऊन धरली आहे. भाजपचे वरिष्ठ नेतेही कबर हटवण्यावरुन बोलत आहेत. त्यानंतर सोमवारीच नागपूरमध्ये या मागणीसाठी आंदोलन झालं. त्यानंतर संध्याकाळी दोन गटात राडा झाला. त्यामुळे शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
संतप्त जमावाने एक क्रेन पेटवून दिली होती. त्यामुळे मोठी आग लागली. त्यानंतर जमावाने जास्तच हिंसा सुरु केली. पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. आग विझवण्यासाठी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
सत्ताधाऱ्यांच्या बोलघेवड्या मंत्र्यांमुळे हा प्रकार घडल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. आज काही संघटनांनी आंदोलन केलं, त्यांनी आंदोलन करण्याची गरज नव्हती. कबरेवर जी काही कारवाई करायची असेल, ती करा. पण त्यासाठी आंदोलन कशासाठी? असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन
आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
