आय.एम.ए अंबाजोगाई च्या वतीने महिला दिनानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बदलती जीवनशैली व महिलांचे आरोग्य ” यावर व्याख्यान संपन्न
आय.एम.ए अंबाजोगाई च्या वतीने महिला दिनानिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बदलती जीवनशैली व महिलांचे आरोग्य ” यावर व्याख्यान संपन्न
*अंबाजोगाई/ प्रतिनिधी
शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून आय.एम.ए अंबाजोगाई च्या वतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ .नवनाथ घुगे , तसेच डॉ अरुणा केंद्रे व डॉ अर्चना थोरात यांचे ‘बदलती जीवनशैली व महिलांचे आरोग्य ’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आय.एम.ए. अंबाजोगाई हे नवनवीन पण महिला हिताचे उपक्रम राबवत असते. ज्यामुळे महिला भगिनींना समाजात जे सर्वोच्च स्थान आहे ते अबाधित राहिले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न राहिला आहे.त्याच निमित्ताने महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाई येथे महिला दिनाच्या निमित्ताने महिला भगिनींसाठी प्रसिद्ध असे हृदयरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे तसेच डॉ अर्चना थोरात, डॉ अरुणा केंद्रे ‘ यांचे बदलती जीवनशैली व महिलांचे आरोग्य ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी आय.एम.ए. अंबाजोगाईच्या वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. अरुणाताई केंद्रे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.अर्चनाताई थोरात आय.एम.ए अंबाजोगाईचे सचिव डॉ.सचिन पोतदार,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रावबावळे सर, प्रा.डॉ.राजमाने सर, श्रीमती मंजुषा जोशी, प्रा. रोहिणी पाठक व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विस्तृत अशा व्याख्यानात डॉ.नवनाथ घुगे यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. समाज जीवनातील वातावरणात महिलांना कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगांना व वातावरणाला सामोरे जावे लागते त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. सामाजिक वातावरण असो की, कौटुंबिक वातावरण असो या ठिकाणी प्रमुख पटलावर महिलाच असतात म्हणून त्यातून तणाव निर्माण होतो आणि वेगवेगळे आजार उद्भवतात. शिवाय महिला भगिनींनी आहारावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. अनावश्यक चरबी वाढते आणि आजार उद्भवतात. महिलांनी अन्न सेवन केल्यानंतर त्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. यावेळी डॉ. घुगे यांनी व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम, वाढलेले वजन व दुष्परिणाम, योगा व प्राणायाम याचे महत्त्व आणि बदलत्या जीवनशैलीबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन करून महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांची उकल करून दिली.

यावेळी डॉ.अरुणाताई केंद्रे,डॉ अर्चनाताई थोरात यांनी सुद्धा स्तानाचा, गर्भाषयाचा कर्करोग व महिला भगिनींच्या इतर आजारासंबंधी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास 500 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय एम.ए.अंबाजोगाईच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
