खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावुन २०-२५ अज्ञात व्यक्तींचा हल्ला- कुटुंबीयांचा आरोप
खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावुन २०-२५ अज्ञात व्यक्तींचा हल्ला- कुटुंबीयांचा आरोप
आष्टी (प्रतिनिधी )
वनविभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवून घर पाडल्या नंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली असून काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात काही जण जखमी झाले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जागा आहे. इथे एक वस्ती बसलेली होती. मात्र, सतीश भोसलेचे गुन्हे समोर आले. त्यानंतर वनविभागाने अतिक्रमण करून अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांना नोटीस बजावली होती. इतर लोकांनी दुसरीकडे स्थलांतर केले. तर सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते.
वनविभागाच्या गट क्रमांक ५१ मध्ये सतीश भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले होते. या प्रकरणी वनविभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. या जागेवर मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला होता. पण, त्याच्याकडून कोणताही दावा न करण्यात आल्याने बुलडोजरने हे घर पाडण्यात आले.
रात्री हल्ला, घराला लावली आग
सतीश भोसले याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, २० ते २५ लोक होते. तोंड बांधलेली होती. त्यांनी अचानक हल्ला केला. आणि त्यानंतर घर पेटवून दिले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुटुंबीयांना मदत केली.
घराला आग लावण्याच्या घटनेवर अंजली दमानियांची टीका
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. “सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं? नाही, हे योग्य नाही. मला खरंच खूप वाईट वाटतंय”, असे अंजली दमानियांनी म्हटले आहे.
जाळपोळ करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
सतीश भोसले उर्फ खोक्या यानी वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे आलिशान बंगला बांधला होता. वनविभागाने या अतिक्रमणाविरूद्ध कारवाई करत घर पाडले. घर पाडल्यानंतर रात्रीच्या वेळेस काही अज्ञातांकडून घराची होळी करण्यात आली. या प्रकरणी जाळपोळ करणाऱ्यांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
