इस्लाममधे मुस्लिमेत्तरांशी सदाचार-अर्शद शेख
इस्लाममधे मुस्लिमेत्तरांशी सदाचार

लेखक : अर्शद शेख
इस्लामचा एक अर्थ ‘सलामती’ अर्थात सुरक्षितता, इस्लामच्या नजरेत सर्व मानवजात एकाच निर्मिकाची निर्मिती आहे आणि म्हणून सर्वजण आपसात बंधू-भगिनी आहेत. कुरआनचे प्रतिपादन आहे की, ‘मानवी समूह वास्तवात एकच समूह आहे, मी तुम्हा सर्वांचा स्वामी आहे. (कुरआन २१:९२)
संपूर्ण मानवजात ही मूळच्या एकाच दाम्पत्याच्या संतानाचा विस्तार आहे. ईश्वराने निर्मिलेल्या पृथ्वीतलावरच मानवजात नांदत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य सृष्टीच्या निर्मिकाने दिले आहे. म्हणून धर्मभेद हे द्वेषाचे किंवा भेदभावाचे कारण होऊ शकत नाही. माणूस कोणत्याही धर्माचा असला किंवा जातीचा जरी असला तरी सर्वप्रथम तो माणूस आहे. मानवतेच्या आधारावर त्याच्याशी सदाचार आणि सौहार्द इस्लामने अनिवार्य केले. प्रेषित म्हणाले, ‘समस्त मानवजात अल्लाह्याच परिवार आहे. या निर्मितीमध्ये अल्लाहला सर्वात जास्त ती व्यक्ती प्रिय आहे, जी या परिवाराशी उत्तम वर्तन करते. (हदीस मिश्कात बहेकी)
इस्लामने चांगला आणि नैतिक व्यवहार केवळ मुस्लिमांपुरताच मर्यादित नसून मुस्लिमेतरांशीसुध्दा सदाचार करण्याची ताकीद केली आहे. नैतिक व्यवहाराबाबत इस्लामने वर्ण, वंश, भाषांदरम्यान तर सोडाच, धार्मिक भेदभावसुद्धा बाळगला नाही. कुरआनात म्हटले आहे की, ‘अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की, तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला घराबाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्याऱ्यांना पसंत करतो.’ (कुरआन ६००८-९)
प्रेषित मुहम्मद (सल्ल) म्हणाले, ‘तुम्ही धरतीवरील (सृष्टीवरील) मानवावर दया करा. अल्लाह तुमच्यावर दया करेल.”
‘प्रेषित मुहम्मद (सल्ल) म्हणाले ‘जो लोकांवर दया आणि कृपा करीत नाही, अल्लाह सुध्दा त्याच्यावर दया आणि कृपा करीत नाही.’ (हदीस बुखारी)
प्रेषितांचे अभिवचन आहे की, ‘जर शक्य असेल तर असे जीवन व्यतित करा की, तुमच्या हृदयात कोणाविषयी द्वेष नसावा. ही माझी जीवनशैली आहे, जो या जीवनशैलीचे अनुकरण करेल तो माझ्यासोबत स्वर्गात राहील. (हदीस मुस्लीम)
प्रेषित म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीचे जीवन, संपत्ती आणि सन्मान इतरांसाठी सन्माननीय आहे. प्रत्येक इमानधारकांना दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनाचे, संपत्तीचे तसेच सन्मानाचे रक्षण आणि आदर करणे अनिवार्य केले गेले आहे.’ यावरून असे स्पष्ट होते की, इस्लाम कोणत्याही भेदभावाची तमा न बाळगता आपल्या अनुयायांना संपूर्ण मानवजातीवर प्रेम, सुरक्षितता आणि सन्मान देण्याचे आदेश देतो.
अगदी युध्दासारख्या आणीबाणीच्या स्थितीत देखील इस्लामने अत्याचाराला सक्तीने मनाई केली आहे, परधर्मीयांच्या धार्मिक स्थळाला कोणतीही क्षती पोहोचू नये, त्याचा अनादर करू नये, प्रत्येक धर्माचा आदर आणि सन्मान करावा, असे आदेश दिले.
एवढेच नव्हे तर मुस्लिमांबरोबर ज्या मुस्लिमेतरांनी युद्ध केले आणि पराभूत होऊन कैदी बनले, अशा आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा इस्लामने शत्रूपक्षाच्या कैद्यांशी सहानुभूतीपूर्वक व्यवहाराची मुस्लिमांना ताकीद केली. कुरआनने अल्लाहच्या लाडक्या दासांचे गुणधर्म स्पष्ट करतांना म्हटले आहे. ‘आणि अल्लाहच्या प्रेमाखातीर गरीब, अनाथ व कैद्यांना जेवू घालतात (आणि म्हणतात) आम्ही तुम्हाला केवळ अल्लाहसाठी जेवू घालीत आहोत. आम्ही तुमच्याकडून कोणताही मोबदला अथवा आभार घेऊ इच्छित नाही. (कुरआन ७६:८-९)
प्रेषित म्हणाले, ‘दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल कधीच अपशब्द बोलू नका.’
प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनी मुस्लिमेतरांशी सदाचाराचे फक्त प्रबोधनच केले नाही तर आपल्या आचरणातून व्याचे उदाहरण प्रस्तुत केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल) त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत, आजारी व्यक्तींची शुश्रूषा करीत. निधन पावलेल्यांच्या आप्तेष्टांचे सांत्वन करीत. तसेच त्यांचा पाहुणचार करत आणि त्यांच्या घरी जेवायला देखील जात. प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनी जाती धर्माच्या आधारे लोकांत कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांशीच उत्कृष्ट वर्तन केले.
आदरणीय जाबीर (रजि) निवेदन करतात की, प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनी सांगितले की, ‘शवयात्रा पाहाल (मग कोणाची असो) तेव्हा आदराने उभे रहा.’
(हदीस बुखारी)
एका माणसाची शवयात्रा पाहून प्रेषित उभे राहिले तेव्हा त्यांना सांगितले गेले की, ती एका ज्युची शवयात्रा आहे. प्रेषित उत्तरले, ‘तो माणूस नाही काय?’
(हदीस बुखारी)
प्रेषित मुहम्मद आपल्या घरातून काबागृहात नमाजला जात असताना वाटेत एक वृद्ध महिला इस्लामच्या द्वेषापोटी त्यांच्यावर केर कचरा टाकत असे. तिचा हा रोजचाच नित्यक्रम होता, परंतु प्रेषितांनी कधी ‘ब्र’ देखील केला नाही. काही दिवस जेव्हा त्या घरातून कचरा आला नाही तेव्हा प्रेषितांनी याचे कारण जाणून घेतले. ती वृद्धा आजारी असल्यामुळे बिछान्यावर पडली असल्याचे त्यांना समजले, प्रेषितांनी घरी जाऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस आणि सुश्रूषा केली. त्यांच्या या सौहार्दपूर्ण वर्तनामुळे वृद्धा प्रभावित झाली आणि तिने इस्लाम स्वीकारला.
(हदीस मुत्तफक अलय)
आदरणीय आस्मा बिन्ते अबुबक (रजि) यांची आई ज्यांनी त्यावेळी इस्लाम स्वीकारला नव्हता, आपल्या मुलीला भेटण्यासाठी मदिनेला आली. आदरणीय आस्मा यांनी प्रेषितांना विचारले की, माझी आई मुस्लिम नाही. मी तिच्याशी कसे वर्तन करावे? प्रेषित उत्तरले की, ‘उत्तम वर्तन करा. जशी एक मुलगी आपल्या आईबरोबर करते.’ (हदीस : बुखारी)
प्रेषितांच्या पत्नी हज़रत आयशा (रजि) नमूद करतात, एकदा एक ज्यु गृहस्थ प्रेषितांना भेटायला घरी आला. प्रेषितांनी त्याचे आदरातिथ्य केले आणि आत्मीयतेने त्याच्याशी वार्तालाप केला. ती व्यक्ती गेल्यानंतर प्रेषित म्हणाले की, हा गृहस्थ सज्जन नव्हता. यावर आदरणीय आयशा (रजि) यांनी आश्चर्याने विचारले की, मग आपण एवढ्या आत्मीयतेने त्यांच्याशी संवाद का साधला. प्रेषित उत्तरले, ‘अल्लाहजवळ ती व्यक्ती अत्यंत निंदनीय आहे, जिच्या दुर्व्यवहारामुळे लोक तिच्यापासून दूर जातात. मी अशी व्यक्ती बनू इच्छित नाही.’
एकदा दाराशिकोहने (औरंगजेबाचा भाऊ) तत्कालीन इस्लामी विद्वावान आदरणीय मुहिबुल्लाह इफाहबादीला विचारले की, ‘शासकीय कामात (प्रकरणात) हिंदू-मुस्लिम भेदभाव करता येतो काय?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘प्रेषित (सल्ल) यांना संपूर्ण सृष्टीसाठी कृपा बनवून पाठविण्यात आले आहे, त्यांची लाभप्रदता समस्त मानवजातीसाठी आहे अर्थात ती सर्वांसाठी आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचा भेदभाव इस्लामच्या धारणे विरुद्ध आहे.”
प्रेषित मुहम्मद (सल्ल) सांगतात, ‘मुस्लिम शासनामध्ये मुस्लिमेत्तर जनतेच्या जीविताचे, संपत्ती आणि सन्मानाचे रक्षण करणे मुस्लिम शासकाचे परम कर्तव्य आहे.’ आदरणीय प्रेषित मुहम्मद (सल्ल) म्हणाले की, ‘तुम्ही सच्चे मुस्लिम होऊ शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही मानवजातीप्रति प्रेम आणि स्नेहाची भावना ठेवत नाहीत.’ (हदीस बुखारी)
कुरआनचे प्रतिपादन आहे की, ‘आदमची समस्त संतती अर्थात संपूर्ण मानवजात आदास पात्र आहे.’ (कुरआन १७:७०)
प्रेषित म्हणाले की, ‘जो मुस्लिम एखाद्या गैरमुस्लिम व्यक्तीवर अन्याय अत्याचार करेल, किंवा त्याचे हक्क हिरावून घेईल, अंतिम न्याय निवाड्याच्या दिवशी मी स्वतः अशा मुस्लिमाविरुद्ध गैरमुस्लिम व्यक्तीचा वकील म्हणून उभा राहीन.’ (हदीस: अबू-दाऊद)
संदर्भ : *”इस्लाम-द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग”* या पुस्तकातुन
