ताज्या घडामोडी

मध्यरात्र फटाक्यांची आतषबाजी, भलामोठा केक अधिकारीही लाजतील अशा थाटात पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस, मात्र दुसऱ्या दिवशी घराचा रस्ता 

मध्यरात्र फटाक्यांची आतषबाजी, भलामोठा केक अधिकारीही लाजतील अशा थाटात पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस, मात्र दुसऱ्या दिवशी घराचा रस्ता 

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी )

 पिंपरी चिंचवड मधल्या पोलीस आयुक्तालयातील एका शिपायाने पोलीस स्टेशनच्या आवारातच मध्यरात्री स्वतःचा वाढदिवस साजरा करत पोलिसांनाच शरमेनं मान खाली घालण्यास भाग पाडल्या नंतर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्याला निलंबित  करण्यात आल्याचे वृत्त आहे.

      प्रवीण पाटील असं या पोलीस अंमलदाराचं नाव असून त्याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस स्टेशनच्या दारातच पोलीस शिपायाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भररस्त्यात रात्री 12 वाजता पोलीस अंमलदार प्रवीण पाटील याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी चार गुन्हेगारही उपस्थित होते. थेट गुन्हेगारच पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाला हजेरी लावत असल्याने त्याचं गांभीर्य आणखी वाढलं होतं.

पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री 12 वाजण्याच्या ठोक्याला फटाक्यांच्या आतषबाजीत वाढदिवस साजरा करण्याचं सुरुवातीपासूनच फॅड आहे. बहुतांश वेळा असे वाढदिवस साजरा होत असताना परिसरातील नागरिकांनाच त्रास होत असतो, म्हणून नागरिक पोलिसांकडे तक्रार करतात मात्र प्रवीण पाटीलचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री त्याचे मित्र सांगवी पोलिस स्टेशन समोर एकत्र जमले होते. यामध्ये पोलीस स्टेशनमधील त्याचे काही सहकारीही होते. यावेळी भलामोठा केक, फटाके, ड्रोन अशी व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीचे 12 वाजताच फटाक्यांची आतषबाजी करत अगदी थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची फायर गणही आणली होती. विशेष म्हणजे ड्रोनचा वापर करत या सगळ्याचं शुटिंग करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी याचं एडिटिंग करत रील शेअर करण्यात आले. काही वेळातच हे रील सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वत: पोलीसच नियमांचं उल्लंघन करत असल्याने आणि गुंडांबरोबर वाढदिवस साजरा करत असल्याने टीका झाली.

वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचं तडकाफडकी निलंबन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!