बोहल्यावर चढण्याआधीच भावी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघातात मृत्यू, रस्त्यावरील ऑईलने केला स्वप्नांचा चुराडा
बोहल्यावर चढण्याआधीच भावी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघातात मृत्यू, रस्त्यावरील ऑईलने केला स्वप्नांचा चुराडा
मुंबई (प्रतिनिधी)
भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असताना एक दुर्घटना घडली आणि होत्याचे नव्हते झाले. दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे गाडी घसरली आणि त्या अपघातात तरुणीवर काळाने घाला घातला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
मागील महिन्यात साखरपुडा झाला, आता दोघेजण लग्नाच्या तयारीला लागले होते. मे महिन्यात त्यांनी बोहल्यावर चढायचे होते. त्यामुळे दोघेही आनंदी होते. संदीप (27) आणि निकिता (25) हे दोघे येत्या 7 मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार होते. 23 फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे दोघेही लग्नाच्या तयारीला लागले होते. दोघेही भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होते. पण 3 मार्चची संध्याकाळ त्यांच्यावर आघात करणारी ठरली. लोअर परळ येथे कामाला असलेल्या निकिताला नेण्यासाठी संदीप ऑक्टिव्हा दुचाकीने आला होता. संध्याकाळी निकिताला घेऊन दोघेही त्या दुचाकीवरून कांजुरमार्गच्या दिशेने निघाले. दरम्यान, साडेसात वाजण्याच्या सुमारास हिंदमाता उड्डाणपुलाच्या उतरणीवर रस्त्यावर पडलेल्या ऑईलने घात केला. ऑईलमुळे दुचाकी घसरल्याने संदीप आणि निकिता रस्त्यावर आडवे पडले. संदीप दुचाकीसह पुढे फरफटत गेला, तर निकिता तेथे पडल्याने गाडी तिच्या अंगावरून गेली.
घटना कळताच भोईवाडा पोलिसांनी तेथे धाव घेऊन दोघांनाही तत्काळ केईएम इस्पितळात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून निकिताला मृत घोषित केले. संदीपवर हा मोठा आघात होता. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत घराच्या दिशेने जात असताना काळाने निकितावर घाला घातला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
