अपयशात दडले आहे यशाचे सूत्र – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
अपयशात दडले आहे यशाचे सूत्र – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पालक आपल्या मुलांना फक्त यशाला सामोरे जायला शिकवितात परंतु, अपयश आले तर काय..? याची मात्र तयारी त्यांच्याकडून करून घेत नाहीत त्यामुळे ज्यावेळी विद्यार्थ्यांना अपयश येते ते स्वीकारण्याची आणि पचविण्याची त्यांची मानसिकता नसते त्यामुळे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जाऊन त्यांचा आत्मविश्वास खचतो. त्यामुळे यशस्वी झालेल्या लोकांच्या कथा वाचण्यापेक्षा अपयशाच्या कथा वाचल्या पाहिजेत. कारण, अपयशाचे हेच अनुभव त्या विद्यार्थ्याला यश कसे मिळवावे याचे सूत्र शिकवितात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
येथील संजीवन एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऍंम्पाच्या अध्यक्षा डॉ.सुलभा पाटील, डॉ.सागर कुलकर्णी, ऍड.संतोष पवार, संस्थेच्या सचिव डॉ.योगिनी नागरगोजे, संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर नागरगोजे, मुख्याध्यापक शेख मुक्तार व जयराम विघ्ने महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.इंगोले यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालक सजग झाला आहे. पालकाला आपला पाल्य ह्या गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेत सर्वात पुढे असावा ही अपेक्षा असते किंबहुना आपली राहिलेली अपुरी स्वप्ने, इच्छा, आकांक्षा ते बळजबरीने विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. हे अपेक्षांचं ओझच आपल्या पाल्याला कळत नकळत कमकुवत बनवत आहेत याची जाणीव पालकांना नसते. या अपेक्षा त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद वाढवला, त्यांच्यातील सुप्तगुणांना हेरले, त्याचा कल कुणीकडे आहे हे तपासले, त्याचा आवडीचा विषय आणि भविष्यातील करीयर याचा जर ताळमेळ पालकांना राखता आला तर आपला पाल्य निश्चितपणे त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच माणुसकीचे संस्कार आणि मूल्य दिले तरच त्या शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो अन्यथा ते शिक्षण मूल्यहीन असले तर त्याचा त्या व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला कसलाच उपयोग होत नाही. सध्याचे शिक्षण हे नौकरी केंद्रित असल्याने ही खंत व्यक्त करीत आणि सध्या जे बदल शिक्षण क्षेत्रात होत आहेत त्याचा समाजावर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत दूरगामी परिणाम होणार असल्याचे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. सध्याची सामाजीक परिस्थिती ही दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करीत जाती, धर्म, गरीब, श्रीमंत ही दरी समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेवर याचा वाईट परिणाम होत आहे त्यामुळे माणूस माणसाला जोडणारी संविधानाप्रति आदर ठेवणारी शिक्षण प्रणाली ही काळाची गरज असल्याचे मत डॉ.राजेश इंगोले यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.योगिनी नागरगोजे यांनी करतांना संस्था ही समाजातील सर्वस्तरांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या शिक्षणासोबतच हे विद्यार्थी माणूस म्हणून घडले पाहिजेत याकडे संस्था कटाक्षाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रयत्न करते असे सांगितले. डॉ.सागर कुलकर्णी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तीन चाके असून यातल्या एकाही चाकाने व्यवस्थित कार्य केले नाही. तर आयुष्याची गाडी व्यवस्थित चालणार नाही असे सूतोवाच करीत पालकाने आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत मांडले. यावेळी ऍड.संतोष पवार यांनीही विद्यार्थ्यांनी शिकून मोठे होऊन आपणही समाजाचे राष्ट्राचे देणे लागतोत या भावनेने उपेक्षित आणि गरजवंतांची मदत केली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले आणि मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य कला सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शेख मुक्तार यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी मानले.
====================
=======================
