शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचे संपादन सुरु, बहुसंख्य गावांमध्ये रस्त्याचे मार्किंग पूर्ण
शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचे संपादन सुरु, बहुसंख्य गावांमध्ये रस्त्याचे मार्किंग पूर्ण
नागपूर ( प्रतिनिधी )
शक्तिपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे या मार्गाचे काम गतीने केले जात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक महिन्यात या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले आसुन या मार्गांवर जी जी गावे येतात त्या पैकी बहुसंख गावा मधून रस्त्याचे मार्किंग केले जात आहे.
नागपूर ते गोवा असा महामार्ग तयार केला जात आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातोय. महत्त्वाच्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. मात्र, या महामार्गासाठी जमीन देण्यास अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. सांगली कोल्हापूर सह मराठवाडा आणि विदर्भात देखील हीच भूमिका शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे मध्यंतरी या महामार्गाचे काम थांबले होते.मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी सुरू करण्याचे आदेश एमएसआरडीसीने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोजणी सुरू आहे. उर्वरित जिल्ह्यातही मोजणी होणार असून, मार्च अखेरपर्यंत ती पूर्ण केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी असेल मोजणी?
शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी केली जाईल. भूसंपादन विभाग, भूमी अभिलेख, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी, वन आणि जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमार्फत ही संयुक्त मोजणी केली जाईल. या मोजणीत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या विहिरी, बोअर, फळझाडे तसेच इतर बाबींची नोंद घेतली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गटानुसार क्षेत्र मोजून त्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.
सरकारची भूमिका सांगणार
शक्तिपीठ महामार्ग सुरू करण्यापूर्वी ज्या गावांतून हा महामार्ग जात आहे, त्या गावांत ग्रामस्थांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात सरकारची भूमिका मांडली जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फत पटवून दिली जाणार आहे.
