ताज्या घडामोडी

देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील हृदयाची पहिली यशस्वी रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया नागपुरात, सर्वत्र कौतुक 

देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील हृदयाची पहिली यशस्वी रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया नागपुरात, सर्वत्र कौतुक 

नागपूर (प्रतिनिधी)

    देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील हृदयाची पहिली यशस्वी रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया नागपुरातील मेडिकल रुग्णालयात करण्यात आली असून  मेडिकल व सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.यंत्र मानवाद्वारे हृदय न उघडता झालेल्या या बायपास शस्त्रक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    शहनाज बेगम (५५) रा. मोठा ताजबाग, नागपूर असे रुग्णाचे नाव आहे. २६ जानेवारीला त्या कुुटुंबासह विमानाची हवाई कवायत बघायला गेल्या होत्या. येथे अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. कुटुंबीयांनी मेडिकल रुग्णालयात हलवले. डॉक्टरांकडून तातडीने रुग्णाची तपासणी केली गेली. यावेळी रुग्णाच्या ह्रदयाचे पंपिंग ३५ टक्क्यांपर्यंत खाली व मुख्य रक्त वाहिनीत ९९ टक्के अडथळे आढळले. रुग्णाला सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवले गेले. येथे ह्रदय शल्यक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश दास यांनी बायपास शस्त्रक्रिया गरजेची असल्याचे सांगितले.

दरम्यान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रोबोटिक बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. आठ दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे हृदय पूर्ण न उघडता १० एमएमच्या छिद्रातून रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अत्यंत कमी रक्तस्त्राव तर खूपच कमी टाके लागले, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज

राज गजभिये यांनी दिली. ही देशातील शासकीय रुग्णालयातील अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी डॉ. सुधीर श्रीवास्तव, डॉ. बतकल, डॉ. रेवतकर आणि चमूची भूमिका महत्वाची होती. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला हृद शल्यक्रियाशास्त्र विभागाचे डॉ. सतीश दास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, ज्येष्ठ कान-नाक- घसा रोगतज्ज्ञ डॉ. अपूर्व पावडे उपस्थित होते.

लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण

मेडिकल रुग्णालयात लवकरच रोबोटिक पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणही केले जाणार आहे. रोबोटद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपित केले जाईल. त्यामुळे रुग्णाला कमीत कमी वेदना व अचूक शस्त्रक्रिया होण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. राज गजभिये यांनी सांगितले.

मेंदू, हाडरोग विभागासाठीही लवकरच सुविधा

सध्या मेडिकलमध्ये उपलब्ध असलेला रोबोट सामान्य, ह्रदय, स्त्रीरोग, मूत्रपिंडासह कान-नाक-घसारोग विभागाशी संबंधित शस्त्रक्रिया करू शकतो. त्यानुसार लवकरच कान-नाक-घसारोगासह मूत्रपिंडाशी संबंधित शस्त्रक्रियाही मेडिकलमध्ये सुरू होणार आहेत. प्रशासनाने मेंदू व हाडरोगाशी संबंधित शस्त्रक्रियेसाठीही रोबोटिक शस्त्रक्रियेचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तो मंजूर झाल्यास त्यावरही रोबोटिक शस्त्रक्रिया होणार असल्याचे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!